१० एकर शेतातील कापसावर चोरट्यांचा डल्ला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:04 PM2021-10-27T17:04:50+5:302021-10-27T17:13:48+5:30
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून कापूस चोरीच्या घटना पाहता खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ : मारेगाव तालुक्यात कापूसचोरीच्या घटनांत वाढ झाली असून रविवारच्या रात्री तालुक्यातील सराटी येथील शेतकरी नंदकिशोर सीताराम भोयर यांच्या १० एकर शेतातील कापसावर चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांत खळबळ निर्माण झाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या सगळीकडे कापूस वेचणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सोयाबीनची कापणी व कापूस वेचणीचा हंगाम एकाच वेळी आल्याने मजुरांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोयाबीनच्या शेंगा झाडाला फुटण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी कापूस वेचणी थांबवून सोयाबीन कापणीला प्राधान्य दिले. त्यामुळे शेतातील कपाशीची बोंडे मोठ्या प्रमाणात फुटून सर्व कपाशीचे शेत चांदण्या रात्रीप्रमाणे पांढरे फटक झाले आहे. कापूस वेचणीला मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कापूस वेचणीचे दर एक किलो कापसासाठी १२ रुपयांवर गेले आहे. तरीही मजूर मिळणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा कापसाच्या चोरीकडे वळविला आहे.
कापसाचे दरही सध्या खुल्या बाजारात वधारले आहेत. ८ हजारांचा आकडा कापसाने ओलांडला आहे. त्यामुळे कापसाचे महत्त्व वाढले आहे. यातून चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी नंदकुमार सीताराम भोयर यांच्या १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात खेडा कापूस खरेदी होत असल्याने कापूस चोरी होत असून खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
खेडा कापूस खरेदीवर कार्यवाही करू
तालुक्यात कापूस चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. पेट्रोलिंगमध्ये वाढ करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. तालुक्यात कोणी अनधिकृत खेडा कापूस खरेदी करीत असेल तर कार्यवाही करण्यात येईल.
- राजेश पुरी, ठाणेदार, मारेगाव