पक्ष्यांनी फुलविलेल्या चंदन पार्कला चोरट्यांची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 05:00 AM2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:11+5:30
उमरठा नर्सरी परिसर घनदाट वनराईचा आहे. या ठिकाणी औषधी गुणयुक्त पांढरा चंदन मिळत होता. या चंदनाचे संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची होती. १९९० च्या सर्वेक्षणात उमरठा नर्सरी परिसरात चंदनाच्या सात हजार झाडांची नोंद झाली. नंतर या चंदन बनाला माणसाची हपापलेली नजर लागली. वनविभागातील फितुरांशी संधान साधून तस्करांनी उमरठा नर्सरी परिसरातील चंदनाची परिपक्व अशी झाडे तोडून नेली.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भरगच्च अशा उमरठा नर्सरी परिसरात चंदनाची तब्बल सात हजार झाडे होती. १९९० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा ही नोंद वनविभागाकडे झाली. मात्र नंतर वनविभागातील फितूर आणि चंदन तस्करांनी हे चंदन बन अक्षरश: उद्ध्वस्त केले. तब्बल २७ वर्षांनी पक्ष्यांच्या सहज प्रवृत्तीमुळे याच परिसरात वारज शिवारात चंदनाची झाडे उगवली. या ठिकाणी जवळपास दीड हजारावर चंदनाची झाडे आहेत. आता हे चंदन पार्क राखण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे. सुरुवातीचे दोन-तीन वर्षे या चंदन पार्कमध्ये लक्ष देण्यात आले. नंतर हे चंदन पार्क बेवारस झाले आहे. चोरटे अजूनही चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड चालवत आहेत.
चंदनाला धार्मिक कार्यात व औषधी गुणांमुळे आयुर्वेदात फार महत्त्व आहे. यामुळेच चंदनाची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. अमूल्य असे चंदनाचे झाड सहजासहजी तयार होत नाही. आता वनविभाग चंदनाची रोपे आणून काही ठिकाणी चंदन वृक्ष लागवडीचा प्रयोग करत आहे. मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही. याउलट निसर्गत: निघालेली झाडे सहज बहरतात, वाढतात. त्यांचे दुर्दैवाने जतन होत नाही. बारीकसे झाडही तोडण्याची प्रवृत्ती कायम आहे.
उमरठा नर्सरी परिसर घनदाट वनराईचा आहे. या ठिकाणी औषधी गुणयुक्त पांढरा चंदन मिळत होता. या चंदनाचे संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची होती. १९९० च्या सर्वेक्षणात उमरठा नर्सरी परिसरात चंदनाच्या सात हजार झाडांची नोंद झाली. नंतर या चंदन बनाला माणसाची हपापलेली नजर लागली. वनविभागातील फितुरांशी संधान साधून तस्करांनी उमरठा नर्सरी परिसरातील चंदनाची परिपक्व अशी झाडे तोडून नेली. दररोज चंदन चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. यावर प्रशासनाला अंकुश लावताच आला नाही. परिणाम उमरठा नर्सरीतून चंदन पूर्णत: नष्ट झाले. एक मोठा नैसर्गिक ठेवा गमावल्याची कुणाला खंत नव्हती.
पक्ष्यांनीच केले चंदन वनाचे पुनरुज्जीवन
उमरठा नर्सरी परिसरातील चंदन बनात तस्करांच्या नजरेतून वाचलेल्या एक-दोन झाडाने पुन्हा चंदनाचे बन फुलविले आहे. पक्षी चंदनाची फळ मोठ्या चवीने खातात. साहजीकच त्यांच्या विष्ठेतून चंदनाच्या बिया जमिनीवर पडतात. याच प्रक्रियेतून वारज शिवारातील नाल्याच्या परिसरात झुडपी जंगलामध्ये चंदनाची रोपटे उगवायला सुरुवात झाली. वाहता नाला असल्याने पक्ष्यांची या परिसरात मोठी वसाहतच आहे. विविध प्रजातीचे पक्षी येथे पाहायला मिळतात. या पक्ष्यांनीच माणसाने हिरविलेला चंदन बनाचा ठेवा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला निसर्गाची साथ मिळत गेली. २०१७ मध्ये वनविभागाला वारज शिवारात जवळपास दीड हजारावर चंदनाची झाडे उगवल्याचे आढळून आले. नंतर यंत्रणेने दखल घेणे सुरू केले. चंदन पार्क म्हणून परिसराला घोषित केले. लाखो रुपयांचा निधी या चंदन पार्कच्या विकासासाठी आला.
चंदन पार्क लिहिलेला फलक खोडला
अगदीच राज्य महामार्गाला लागून असलेल्या चंदन पार्कसमोर संरक्षण भिंत बांधून त्यावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. प्रत्येकाचे लक्ष वेधले जाईल, अशाप्रकारे चंदन पार्क म्हणून त्यावर लिहिण्यात आले. याचा दुष्परिणाम काही दिवसात दिसायला लागला. चंदनाच्या कोवळ्या झाडावर कुऱ्हाडी चालविणे सुरू झाले. चंदन हा शब्द खोडून केवळ पार्क असा नामोल्लेख ठेवण्यात आला. या पार्कला केलेले जाळीचे संरक्षण पहिल्याच पुरात वाहून गेले. आता अर्ध्यापेक्षा जास्त परिसर सताड उघडा पडला आहे. कोण कधी येते, कधी जाते हे हटकण्यासाठी वनविभागाकडून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेले नाही. या ठिकाणी वाॅच टाॅवर, लेबर शेड आहे. मात्र पूर्णवेळ चाैकीदार नाही. वनरक्षक त्यांच्या सोयीने भेटी देतात. त्यामुळे पुन्हा निपजलेले चंदनाचे बन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संवर्धनाच्या नावाखाली केवळ सोपस्कार सुरू आहे.
चंदन पार्क तयार केले. आता कुणी लक्ष देण्यास येत नाही. कोवळ्या झाडांचीच कत्तल सुरू आहे. याचा हिशेबही ठेवला जात नाही. पार्कच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.
- सुधाकर डोळे, जामवाडी
चंदनाच्या झाडाची देखभाल केली जात नाही. उन्हाळ्यात कोवळी रोप वाळून गेली. या कालावधीत किमान तीन महिने पाणी देणे अपेक्षित होते. वनविभागाचा असाच दृष्टिकोन राहिल्यास हे चंदन पार्कसुद्धा लवकरच नष्ट होईल. यावर झालेला लाखोंचा खर्च व्यर्थ ठरताना दिसत आहे.
- सुभाष कवाने, वारज
चंदनाची साडेतीन हजारावर झाडे पार्कमध्ये होती. आता येथे सुरक्षा रक्षक नसल्याने चोरी वाढली आहे. साैंदर्यीकरणाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. पैसे नसल्याने येथील चाैकीदार दोन वर्षापूर्वीच काम सोडून गेला. याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. अद्याप प्रतिसाद नाही.
- रामनाथ खडके,
अध्यक्ष वनसमिती, वारज
शेतात जाण्याचा रस्ता बंद करून हे पार्क तयार केले. याला आमची हरकतही नाही. मात्र आता वनविभागाकडून या चंदन पार्ककडे लक्ष देण्यात येत नाही. राजरोसपणे चोरी सुरू आहे. येथील गार्ड, चाैकीदार फिरकतही नाही.
- पंजाब अवथळे, जामवाडी