चोरट्यांनी केली गोटमार; एकाच रात्री दोन गावांत घरफोड्या, दागिन्यांसह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 05:46 PM2022-07-06T17:46:25+5:302022-07-06T17:48:45+5:30
चोरटे बिटरगाव पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन पसार होत आहेत. आत्तापर्यंत एकाही चोरीचा शोध लागला नाही. त्यामुळे बिटरगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अहे.
ढाणकी (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व करंजी येथे एकाच रात्री चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास केली. ही घटना रविवारी रात्री घडली.
करंजी येथे २५ हजारांचे दागिने, तर सावळेश्वर येथे दोन घरातून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरट्यांनी लंपास केली. रविवारी रात्री करंजी येथील पंडित कलाने यांच्या घरात सात चोरट्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांच्या हालचालींची चाहुल पंडित यांची पत्नी पूजा यांना लागताच त्यांनी पतीला चोरटे घरात घुसल्याची कल्पना दिली. त्या आपल्या खोलीचे दार बंद करण्याच्या तयारीत असतानाच चोरट्यांनी तो उघडला. यावेळी पंडित कलाने, पूजा आणि चोरट्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
चार चोरट्यांनी गोटमार केली. त्यात पंडित जखमी झाले. तरीही त्यांनी चोरट्यांशी दोन हात केले. पूजा यांनी तीन चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी त्यांचे सासरे रूमची बाहेरून बंद असलेली कडी उघडण्यासाठी धडपडत होते. चोरट्यांसोबत झटापट सुरू असताना ते गोटमार करीत होते. पूजा यांचे सासरे गणेश कलाने मदतीला धावताच चोरांनी त्यांच्यावरही दगडांचा मारा केला. पूजाने काठी घेऊन घराचे टिनपत्रे आतमधून वाजविण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता पकडले जाऊ शकतो, या भीतीपोटी चोरट्यांनी पंडित यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. पूजाच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून त्यांनी धूम ठोकली.
करंजी येथे पूजाच्या धाडसामुळे चोरांना फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा सावळेश्वरकडे वळविला. तेथे नागोराव रावते यांचे किराणा दुकान फोडून २० हजार रुपये चोरले. नंतर लगतच्या खोलीत त्यांची आई जिजाबाई रावते (६५) झोपेत असताना त्यांना जागे करून गळ्याला चाकू लावला. त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. एवढेच नव्हे, तर खोलीतील कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. कपाट तोडून दागिने चोरले. दरम्यान, चोरांच्या हालचाली आणि आईची ओरड यामुळे नागोराव यांचे बंधू जागे झाले. त्यांच्यावर चोरट्यांनी दगडफेक सुरु केली. दागिने घेऊन चारटे पसार झाले. तेथीलच संभाजी सादलवाड यांचे किराणा दुकान फोडून १२ हजारांची रोकड लंपास केली.
परिरसरात पसरली दहशत
गांजेगाव, टेंभेश्वरनगर, शमशेरनगर, सोईट, सावळेश्वर आदी ठिकाणी दिवाळीच्या कालावधीत घरफोडी करून दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र, पोलिसांना अद्याप चोरटे गवसले नाहीत. चोरटे बिटरगाव पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन पसार होत आहेत. आत्तापर्यंत एकाही चोरीचा शोध लागला नाही. त्यामुळे बिटरगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अहे. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने परिसरात दहशत पसरली आहे.