मध्यरात्री सोयाबीनची चोरी, पोते दुचाकीवर टाकून निघणार तेवढ्यात मालकाला जाग आली अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:45 PM2022-01-06T14:45:52+5:302022-01-06T14:52:56+5:30
चोरटे सोयाबीनचे पोते चोरून दुचाकीवरून पळत असताना अचानक घरमालकाला जाग आली व सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांना पळताच आले नाही.
यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून परिसरात सोयाबीन चोरीच्या (soyabean theft) घटना वाढल्या आहेत. घराशेजारील साठवून ठेवलेले सोयाबीनचे पोते मोटारसायकलवरून लंपास करण्याचा प्रकार सुरू असताना अचानक घरमालकाला जाग आली व चोरटे सापडले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोन्ही चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना मारेगाव तालुक्यातील हिवरा-मजरा येथे घडली.
तालुक्यातील वेगाव, सराटी, नांदेपेरा येथील कापूस, सोयाबीन चोरीतील आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसतानाच पुन्हा हिवरा-मजरा येथे सोयाबीन चोरीचा प्रकार समोर आला आहे. सुमीत मनवर बोधाने रा. हिवरा-मजरा या शेतकऱ्याने या हंगामातील आठ ते दहा क्विंटल सोयाबीन पोते भरून घरासमोरील टीनेच्या शेडमध्ये ठेवले होते.
बुधवारी रात्री गावातीलच दिलीप लहानू रामपुरे व विकास सुखदेव बंदलवार या दोन्ही चोरट्यांनी सोयाबीन चोरायचे ठरवले. त्यांनी रात्री २.५० च्या दरम्यान सोयीबीनचे पोते चोरले व दुचाकीवर (एम. एच. २९-ए. बी. ४२८) टाकून निघाले. इतक्यात फिर्यादीचे वडील मनवर बोधणे हे लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी चोर-चोर म्हणून जोराने आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने शेजारील नागरिक जागे झाले. या धावपळीत चोरट्यांना पळणे जमले नाही व ते सापडले. नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन भादंवि कलम ३८०, ४६१ कलमाखाली गुन्हा दाखल केला. यापूर्वी शेतमाल चोरीच्या घटना तालुक्यात घडल्या. त्या घटनांशी या आरोपीचा काही संबंध आहे काय? याचा तपास पोलीस करीत असून पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.