चोरट्यांना न्यायालयाने ठोकला दोन हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:38+5:302021-08-20T04:48:38+5:30
गजानन शंकर आत्राम, रा. धामणी व विकास विठ्ठल तोडासे, रा. खैरगाव (जवादे), ता. राळेगाव, अशी दंड ठोठावण्यात आलेल्या ...
गजानन शंकर आत्राम, रा. धामणी व विकास विठ्ठल तोडासे, रा. खैरगाव (जवादे), ता. राळेगाव, अशी दंड ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. येथील एका इसमाने त्याची मोटारसायकल घरासमोर उभी केली असता, ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. ही बाब लक्षात येताच आजूबाजूला चौकशी केली असता, ही दुचाकी दोन तरुणांनी धामणी रस्त्याने ढकलत नेल्याची माहिती समोर आली. रात्र झाल्याने फिर्यादीने सकाळी धामणी येथे जाऊन गावकरी व पोलीस पाटीलांना विचारपूस केली. यावेळी आरोपी गजानन आत्राम व त्याचा मित्र दोघेही चोरीतील दुचाकी खैरगाव जवादेकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. फिर्यादीने मित्राला सोबत घेऊन शोध घेतला असता, पिंपळगाव रस्त्यावर पेट्रोल संपल्याने आरोपी मोटारसायकलसह फिर्यादीच्या हाती लागले. त्या दोघांनाही पकडून मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३७९, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तपास अधिकाऱ्यांसह सहा साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. साक्षीदारांचे बयाण ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी वकील पी.डी. कपूर व कोर्ट पैरवी जमादार ढुमणे यांनी काम पाहिले.