शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 03:45 PM2022-03-25T15:45:03+5:302022-03-25T15:59:51+5:30
घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला.
ढाणकी (यवतमाळ) : कापूस विक्रीचा चुकारा घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत तिखट फेकून दोन भामट्यांनी रोख तीन लाख २० हजार रुपये चोरून नेले. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील निंगनूर ते मेट दरम्यानच्या घाटात घडली.
गणेश राठोड असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते मेट येथील रहिवासी असून, गुरुवारी त्यांनी फुलसावंगी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. कापूस विकल्यानंतर तीन लाख २० हजार रुपयांचा चुकारा घेऊन ते सहकाऱ्यासह आपल्या दुचाकीने निंगनूर मार्गे मेटकडे निघाले होते. दरम्यान, घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. त्यामुळे राठोड व त्यांचा मित्र दुचाकीवरून खाली आदळले. भामट्यांनी त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅग राठोड यांच्या खांद्याला लटकवलेली असल्याने निघत नव्हती. त्यामुळे दोन्ही भामट्यांनी राठोड व त्यांच्या मित्रासोबत झटापट करून चाकूचा धाक दाखविला. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला.
दरम्यान, दुचाकीवरून आदळल्याने आणि डोळ्यांत तिखट गेल्याने गणेश राठोड व त्यांचा सहकारी भांबावले होते. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे कशीबशी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. भामटे निंगनूरच्या दिशेने गेल्याबाबत तेथील पोलीस पाटील उत्तम मुडे यांना माहिती दिली. त्यांनी बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. राठोड यांच्याकडून माहिती घेतली. मात्र तोपर्यंत भामटे गायब झाले होते. बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात लुटारूंविरुद्ध भादंवि ३९२, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला.