विदर्भ हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:08+5:30
वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सर्वच लोखंडी कपाट फोडले. इतकेच नव्हे तर लाकडी कपाट व इतर ठिकाणीही मुद्देमालांचा शोध घेतला. यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सविता माणिकराव शेवतकर यांचे हे घर आहे. त्या मुलीकडे पुणे येथे गेल्या आहेत. बंद घराचे दार उघडे दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नव्या वर्षातही चोरट्यांनी आपला दबदबा कायम राखत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. शहरातील घरफोड्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. पोलिसांना मात्र चोरटे सापडलेले नाही. येथील मार्इंदे चौकातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात सोमवारी रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडली. तेथून ४० ग्रॅम सोन्यासह मोठा मुद्देमाल लंपास केला. सकाळी शेजाऱ्यांना बंद घर उघडे दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सर्वच लोखंडी कपाट फोडले. इतकेच नव्हे तर लाकडी कपाट व इतर ठिकाणीही मुद्देमालांचा शोध घेतला. यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सविता माणिकराव शेवतकर यांचे हे घर आहे. त्या मुलीकडे पुणे येथे गेल्या आहेत. बंद घराचे दार उघडे दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. बघितले असता घराचे चारही दरवाजे उघडलेले होते व साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. त्यांनी चोरी झाल्याची माहिती शेवतकर यांना दिली. याच परिसरातील काही अंतरावर संजय डोळे हे कुटुंबासह वर्धा येथे गेले होते. त्यांच्या घराचेही मुख्य दार उघडे होते. याची माहिती शेजाºयांनी डोळे यांना दिली. डोळे यांच्या गावातील नातेवाईकांनी घराला भेट दिली. तेव्हा तेथेही चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. डोळे यांच्या घरुन ४० ग्रॅम सोने चोरी गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी झालेल्या दोन्ही घरातील कुटुंब गावात नसल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याचा अधिकृत आकडा आला नाही. दुपारपर्यंत या प्रकरणात कुठलीही तक्रार अवधूतवाडी पोलिसांना प्राप्त झाली नव्हती. पोलिसांनी या घटनांमधील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज गोळा करणे सुरू केले होते.
पोलिसांपुढे आव्हान
अवधूतवाडी ठाण्यात मोठ्या प्रमाणात घरफोड्या होत असून यातील एकही गुन्हा उघडकीस आणण्यात यश आलेले नाही. तसेच स्थानिक गुन्हे शाखेची शहरातील पथकेही कुचकामी ठरत आहे. चोरट्यांनी संपूर्ण पोलीस दलापुढेच मोठे आव्हान उभे केले आहे. तक्रारी दाखल होऊनही गुन्हा उघड होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.