काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या शर्यतीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’

By admin | Published: December 28, 2016 12:13 AM2016-12-28T00:13:13+5:302016-12-28T00:13:13+5:30

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची

Third 'entry' in the Congress district contest | काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या शर्यतीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’

काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या शर्यतीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’

Next

मुंबईतील बैठक गाजली : वाद दिल्लीत जाण्याची चिन्हे
यवतमाळ : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता आणखी वाढला आहे.
मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हा काँग्रेस कमिटीने अध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नावाची शिफारस केली आहे. या दोघांमधूनच कॉँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असा अंदाज असताना मुंबईतील बैठकीत अचानक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांच्या नावाची एन्ट्री झाली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या नावाला ऐनवेळी पसंती दर्शविल्याचे सांगितले जाते. दोन नावे असतानाच जिल्हाध्यक्ष पदाचा दोन महिन्यांपासून निर्णय झाला नाही. आता त्यात तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी जिल्हाध्यक्ष पदाचा सोक्षमोक्ष लावायचाच अशा इराद्याने जिल्ह्यातील काँग्रेसची तमाम प्रमुख नेते मंडळी प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात पोहोचली होती. मात्र तेथे तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे पेच निर्माण झाला. जिल्हाध्यक्षपदाचा तोडगा मुंबईत निघण्याची शक्यता कमीच आहे. हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वीसुद्धा काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा वाद दिल्लीपर्यंत गेला होता, हे विशेष.
सेनापतीविना निवडणुकीची चिन्हे
जानेवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आचारसंहितेपूर्वी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळावा म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तिसऱ्या नावामुळे वाढलेला गुंता लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेसला अध्यक्षाशिवाय जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लढाव्या लागतात की काय, अशी शंका कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. वृत्तलिहीस्तोवर मुंबईतील काँग्रेसची बैठक सुरूच होती. (जिल्हा प्रतिनिधी)

जनआक्रोश यात्रा रद्द केल्याने नेत्यांची झाडाझडती
सूत्रानुसार, मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने २९ डिसेंबरपासून भाजपा सरकारच्याविरोधात जनआक्रोश यात्रेची घोषणा केली होती. मात्र पक्षाला जिल्हाध्यक्ष नसल्याचे कारण सांगून ही यात्रा परस्परच रद्द करण्यात आली. याच मुद्यावरून प्रदेशाध्यक्षांनी आपली नाराजी प्रकट केल्याचे सांगितले जाते. शिवाय यात्रा रद्दबाबत पक्षश्रेष्ठींना न कळविता जिल्ह्यातील नेते थेट प्रसार माध्यमांना ‘अ‍ॅप्रोच’ झाल्याने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची नाराजी आणखी वाढल्याचे समजते.

Web Title: Third 'entry' in the Congress district contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.