शेतकऱ्यांच्या तुरीचे १३ कोटींचे चुकारे अडले
By admin | Published: April 18, 2017 12:04 AM2017-04-18T00:04:26+5:302017-04-18T00:04:26+5:30
नाफेडने जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र या तुरीचे तब्बल १३ कोटींचे चुकारे अडले आहेत.
११ केंद्रांवर झाली खरेदी : चार केंद्र राहिले बंद, २२ एप्रिलपर्यंत खरेदीच्या मौखिक सूचना, शेतकरी धास्तावले
यवतमाळ : नाफेडने जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र या तुरीचे तब्बल १३ कोटींचे चुकारे अडले आहेत. अशा परिस्थितीज तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या आहे. यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
जिल्ह्यात नाफेडने १५ केंद्रावर आतापर्यंत एक लाख ३० हजार क्विंटल तुरीची खरेदी केली. ही खरेदी ६५ कोटी ६५ लाख रूपयांच्या घरात आहे. खरेदी झालेल्या तुरीपैकी १३ कोटींचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. नाफेडने १५ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केली. असे असलेतरी खरेदी केलेल्या तुरीपैकी २० मार्चपर्यंतच्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. गत २५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाही. आता २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तूर विकली त्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील की नाही असी धास्ती निर्माण झाली आहे.
सोमवारी दुपारी धडकला आदेश
१५ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचे पत्र नाफेडने पाठविले. यावर जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापतींनी आवाज उठविला. पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे याची कैफियत मांडण्यात आली. दोन महिने ही मदतवाढ देण्याची मागणी सभापतींनी केली. प्रत्यक्षात सात दिवसाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. गुरूवारच्या घटनाक्रमानंतर तीन दिवसाचा अवधी लोटला. परंतु लेखी पत्रच आले नाही. यामुळे तूर खरेदीचा गोंधळ वाढला. जिल्ह्यातील १५ शासकीय तूर खरेदी केंद्रापैकी ११ केंद्रावर तूर खरेदी करण्यात आली. तर व्हीसीएमएसच्या चार केंद्रावर पत्राअभावी खरेदी बंद ठेवण्यात आली. यामध्ये यवतमाळ आणि बाभूळगावचा समावेश आहे. आर्णी आणि राळेगावमध्ये खरेदी बारदाण्या अभावी थांबली आहे. (शहर वार्ताहर)
सायंकाळी आले पत्र
नाफेडने १५ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचे पत्र बाजार समित्यांना दिले. गुरूवारी सात दिवसाची मुदवाढ मिळाल्याची माहिती पुढे आली. मात्र लेखी पत्र नव्हते. यामुळे शासकीय खरेदी केंद्र संभ्रमात सापडले होते. सोमवारी दुपारी खरेदी केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र धडकले. यामुळे दुपार नंतर शासकीय खरेदी केंद्राचा संभ्रम दुर झाला.