यंदा दिवाळीपूर्वीच वाढल्या टंचाईच्या झळा, अवघा ७३ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:01 PM2023-11-01T15:01:26+5:302023-11-01T15:04:07+5:30
३०५ गावे, ८९७ वाड्यांना टॅंकरद्वारे पुरवठा
विशाल सोनटक्के
यवतमाळ : या वर्षी अनेक भागांत पावसाने दडी मारली. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील प्रकल्पांमध्ये १३ टक्के पाणीसाठा कमी आहे. विशेषत: छत्रपती संभाजीनगर विभागात अवघा ३९ टक्के पाणीसाठा असल्याने, यंदा दिवाळीपूर्वीच विविध भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. राज्यातील ३०५ गावे आणि ८९७ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दिवसेंदिवस या टॅंकरमध्ये वाढ होत आहे.
नागपूर विभागात यंदा पावसाचा जोर होता, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत या विभागातील ३८३ प्रकल्पांमध्ये ८६.९२ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा ७९.९१ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील २६१ प्रकल्पात गतवर्षी ९६.२६ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ८२.२७ टक्के आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा यंदा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. गतवर्षी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ९२० प्रकल्पांत ८९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा या विभागात निम्म्याहून कमी म्हणजे अवघा ३९.६४ टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासूनच टॅंकरची संख्या वाढू लागली आहे.
नाशिक विभागातील ५३७ प्रकल्पांमध्ये गतवर्षी ८९.११ टक्के पाणी होते. यंदा या विभागातही साठा घसरला आहे, तेथे ७७.६८ टक्के पाणी उपलब्ध आहे. पुणे विभागातील ७२० प्रकल्पांमध्ये ९२.३३ टक्के पाणीसाठा मागील वर्षी उपलब्ध होता. यंदा यामध्ये १४ टक्के घट दिसत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या विभागातील ७२० प्रकल्पांमध्ये ७८.७५ टक्के पाणीसाठा आहे. कोकण या एकमेव विभागात यंदा गतवर्षीप्रमाणेच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या विभागातील १७३ प्रकल्पांत ८९.२७ टक्के पाणी होते. यंदाही या विभागात ९०.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यंदा पावसाने केलेला कानाडोळा आणि त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात झालेली घट यामुळे मराठवाड्यासह पुणे व कोकणातील काही जिल्ह्यांतही टॅंकरची संख्या वाढू लागली असून, पुढील काळात हे संकट अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिकमध्ये १२०, तर पुणे विभागातील १०४ गावांची मदार टॅंकरवर
मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांसह पाणी टॅंकरची संख्याही वाढली आहे. नाशिक विभागातील १२० गावे आणि २४१ वाड्यांना ११४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागालाही या वर्षी टंचाईची झळा सोसाव्या लागत आहे. या विभागातील १०४ गावे आणि ६३५ वाड्यांसाठी १०९ टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मराठवाड्यात यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विभागातील ८१ गावे आणि २१ वाड्यांना ९१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या विभागातील औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये टंचाईची तीव्रता असून, औरंगाबादमधील ५५, तर जालन्यातील २६ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
खरीप २०२३ या हंगामातील परिस्थितीच्या आधारे प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केल्यानंतर पर्जन्याची तूट, भुजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या बाबींचा विचार करून राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यातील ४० तालुक्यांमध्ये सवलतीही लागू करण्याबाबतचे आदेश शासनाने मंगळवारी जारी केले. दुष्काळ जाहीर केलेल्यांपैकी २४ तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाचे असून १६ तालुके मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाचे आहेत.