Yavatmal: "ज्यांनी पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचं?" चंद्रकांत खैरे यांचा सवाल
By विशाल सोनटक्के | Published: March 2, 2023 03:42 PM2023-03-02T15:42:57+5:302023-03-02T15:44:43+5:30
Chandrakant Khaire: ज्यांनी राजकीय फायद्यासाठी शिवसैनिकांचे वडील, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचे, असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे.
- विशाल सोनटक्के
यवतमाळ : ज्यांनी राजकीय फायद्यासाठी शिवसैनिकांचे वडील, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना चोर नाही तर काय म्हणायचे, असा प्रश्न करीत संजय राऊत हे विधिमंडळाला चोर म्हणाले नाहीत, तर विधिमंडळातील चोरांबद्दल ते बोलल्याचे सांगत शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची पाठराखण केली. राऊत हे खंबीर नेते आहेत. ते हक्कभंगाला घाबरणार नाहीत, असेही ते म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुधवारी पक्षातर्फे वणी आणि यवतमाळ येथे शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दुपारी ते यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरही जोरदार टीका केली. राठोड यांची ओळख पैसे घेतल्याशिवाय काम न करणारे नेते, अशी आहे. महसूल राज्यमंत्री असताना एकही काम त्यांनी पैसे घेतल्याशिवाय केले नाही. शिवसैनिकांच्या कामातही ते अपेक्षा ठेवायचे. मी स्वत: त्यांना अनेकदा शिवसैनिकांची कामे तरी पैसे न घेता करीत जा, असे सांगितले होते.
शिवसेनेने संजय राठोड यांना पद, प्रतिष्ठा सगळे दिले. मात्र, तरीही ते खुर्ची सोडून का पळाले. पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ तावातावाने बोलायच्या. आता भाजपसोबत सलगी केल्यानंतर राठोड पवित्र झाले का, पूजा चव्हाणचे प्रकरण बंद झाले का, असा प्रश्न करीत खासदार भावना गवळी यांनी भाजपचा हात धरला. त्यांनाही इडीने माफ केले का, अशी विचारणा खैरे यांनी केली. शिंदेंच्या गद्दारीमुळे शिवसेनेचे सरकार पडले आहे. याचा जाब येणाऱ्या निवडणुकात जनताच विचारेल, असे सांगत येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार येईल. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहनही खैरे यांनी केले.