हजारो पशुंचे आरोग्य पर्यवेक्षकांच्या भरवशावर; लम्पी साथरोगाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:37 PM2020-09-23T14:37:47+5:302020-09-23T14:38:11+5:30
सध्या तालुक्यात लंपी स्कीन या पशुंच्या जिवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत मोठी यंत्रणा कामी लावण्याची आवश्यकता असतांना धड आहे त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाही. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आपल्याच तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील १४८ गावातील हजारोच्या संख्येने असलेल्या पशुंचे आरोग्य केवळ मोजक्या पशुधन पर्यवेक्षकांच्या भरवशावर आहे. त्यामुळे पशुंचे आरोग्य धोक्यात आले असल्याची ओरड पशुपालक व शेतकऱ्यांमधून होत आहे.
सध्या तालुक्यात लंपी स्कीन या पशुंच्या जिवघेण्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत मोठी यंत्रणा कामी लावण्याची आवश्यकता असतांना धड आहे त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जात नाही. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आपल्याच तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभागात दारव्हा, बोरी, लोही येथे पशुधन विकास अधिकारी, लाडखेड व सायखेड सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पेकर्डा, तळेगाव, खोपडी, भांडेगाव, चिखली, बोदेगाव, पिंपळखुटा, लाख, गोंडेगाव, दहेली, महागाव, वडगाव अशा १५ ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक व परिचर तसेच काही ट्रेसर याप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे. बोरी, लोही श्रेणी-१, सायखेडा व लाडखेड येथे श्रेणी-२ तर १५ गावात पशु वैद्यकीय दवाखाने आहे.
प्रत्येक दवाखान्यांतर्गत ७ ते ८ गावे जोडण्यात आली आहे. हीच यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अलीकडच्या काळात पशुंच्या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विषबाधा तसेच इतर आजारामुळे शेकडो पशुंना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करण्याचे आवाहन केल्या जाते. अशावेळी मार्गदर्शन करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. तरीसुद्धा तालुक्यात पशु दवाखान्यांमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे आजारी पशुंना १० किलोमीटर अंतरावर असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्याची पाळी पशुपालकांवर येत आहे. तसेच या जोडधंद्याला प्रोत्साहन मिळत नाही. सध्या तालुक्यात लंपी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे. अशा स्थितीत प्रत्येक गावात पशुंवर उपचार, या आजाराची लागण होऊ नये याकरिता जनजागृतीची आवश्यकता आहे.
परंतु यंत्रणा तोकडी असल्याने यासाठी फारसे प्रयत्न होतांना दिसत नाही. उलट आहे त्या अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्या जात नाही. मुख्यालय दारव्हा तसेच बोरीचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. लोहीचे पद आत्ता कुठे भरले. तर सायेखेड येथील सहायक पशुधन विकास अधिकारी व काही पशुधन पर्यवेक्षकांची पदेसुध्दा रिक्त आहे. साथरोगाची स्थिती पाहता तत्काळ ही सर्व रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी आहे. प्रशिक्षण नसलेले पर्यवेक्षक जनावरांवर उपचार करीत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांवर अन्याय
एकीकडे पदे रिक्त असतांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाºया बदलीपात्र अधिकाऱ्याने विनंती करुनही त्यांची बदली या ठिकाणी केल्या जात नाही. आर्णी तालुक्यात कार्यरत एका सहाय्यक पशुधन विकास अधिकाºयाची सेवेची १३ महिने शिल्लक आहे. त्यांनी वयाची ५३ वर्षे पूर्ण केल्यामुळे ग्रामविकास विभागाच्या बदली धोरणानुसार सायखेड येथील रिक्त पदावर बदलीची मागणी केली आहे. तब्बल सहा वर्षे नक्षलग्रस्त भागात सेवा दिली. सध्या तीन वर्षांपासून याच भागात सेवा देत आहे. शासनाचे नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम न्याय देण्याचे धोरण असताना त्यांचा विनंती अर्ज अनेक दिवसांपासून दुर्लक्षित आहे. जिल्हा परिषद त्यांची बदली का करीत नाही, हे एक कोडेच आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा तालुका
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांचा गृह तालुका असलेल्या दारव्हा तालुक्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचायत समितीवर वर्चस्व, जिल्हा परिषदेचे पाचही सदस्य अशी एकहाती सत्ता असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.