यवतमाळात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:08 PM2019-02-21T22:08:56+5:302019-02-21T22:09:55+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना चार ते सहा दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या मागे आगामी उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत असे सोज्वळ कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुढे केले जात आहे. तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा सर्रास अपव्यय होत आहे. या विसंगतीला प्राधिकरणच जबाबदार असल्याचा आरोप उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागणाºया यवतमाळकर नागरिकांमधून केला जात आहे.
निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये ८५ टक्के जलसाठा आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. गत वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना यवतमाळकरांना करावा लागत आहे.
धरणात मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्राधिकरणाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच पाण्याची भीषण स्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाईप लाईन फुटली आहे.
विशेष म्हणजे, वर्षभरापासून शहरातील विविध भागात दररोज पाईप फुटत आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनची चाळणी झाली आहे. यातून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाला याची वारंवार सूचना दिल्यानंतरही पाईपलाईन दुरूस्त होत नाही. उलट फुटणाºया पाईपलाईनमध्ये आणखी भर पडत आहे. यामुळे शहरात प्रत्येक भागाला अघोषित वेळापत्रकाचा सामना करावा लागत आहे. १० ते १२ दिवस नळ नाही अशी अवस्था संपूर्ण शहराची झाली आहे.
न्यायपालिकेसमोरच पाण्याचे लोट
गुरूवारी जिल्हा न्यायालयापुढे जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन फुटली. यातून हजारो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे, सहा ते सात फूट उंच पाण्याचे कारंजे या ठिकाणी तासभर उडत होते. यानंतर पाईप लाईन बंद करण्यात आली. येथे खोदलेल्या नालीत पाणी साचल्याचे चित्र आहे.