रेशनच्या तूर, चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:53 PM2019-05-13T21:53:07+5:302019-05-13T21:53:37+5:30
गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रेशनची लाखोंची तूरडाळ खुल्याबाजारात विकल्या गेल्याचे स्पष्ट होत असून ही पाकिटे फेकणारा विक्रेता शोधण्याचे आव्हान पुरवठा विभागापुढे आहे.
स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वाईप मशिनचा वापर होत आहे. मात्र आता या स्वाईप मशिनवरही विक्रेत्यांनी जालीम उपाय शोधला आहे. त्याची साक्ष या रिकाम्या पाकिटांनी दिली. स्वस्त धान्य विक्रेत्यांच्या ‘चोरवाटा’ही यानिमित्ताने उघड झाल्या आहेत.
गरिबांना स्वस्त दरात डाळ मिळावी म्हणून पुरवठा विभागाने तूरडाळ आणि चणाडाळीचा पुरवठा सुरू केला आहे. रेशन दुकानातून वितरित झालेली डाळ रेकॉर्डवर यावी म्हणून स्वाईप मशिनचाही वापर केला जात आहे. विक्री करण्यात आलेली तूरडाळ आणि चणाडाळ स्वाईप मशिनवर आली आहे. मात्र ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचली नाही. म्हणूनच डाळीची रिकामी पाकिटे जंगलात फेकली गेली.
‘जनहित’ची दक्षता
यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरी जंगलाच्या वाटेवर डाळीची ही रिकामी पाकिटे फेकली गेली. जनहित माझे गाव संघटनेचे अध्यक्ष विलास झेंडे, नरसिंग आडे, प्रवीण ढोकळे, सुप्रित गणवीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. त्यांनी तातडीने याची प्रशासनाला खबर दिली.
पूर्वी लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभागामार्फत विविध साहित्य वाटप केले जात होते. हे साहित्य लाभार्थी कमी दरात गावात विकत होते. यातून गावातील धनधांडग्यांचाच लाभ झाला. तसाच प्रकार आता डाळीमध्ये होत आहे. शेकडो क्विंटल तूरडाळ आणि चणाडाळीची अशाच पद्धतीने विल्हेवाट लावली गेली आहे.
दुप्पट नफ्यासाठी लढविली शक्कल
स्वस्त धान्य दुकानातून विक्री झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट ग्राहकांनी खरेदी केले. ते पाकीट पुन्हा दुकानदारांनी कमी दरात खरेदी केले. खरेदी झालेले तूर आणि चणाडाळीचे पाकीट रिकामे करून खुल्या बाजारात विकले गेले. त्यावर डबल नफा कमविला आहे. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ही डाळ ५० रूपये किलोने विकली जात आहे. यामुळे तूरडाळीतून विक्रेत्यांना क्विंटलमागे तीन हजारांचा नफा होणार आहे. त्यासाठीच हा गैरप्रकार झाला आहे. चणाडाळ बाजारात ६५ रूपये किलो आहे. तर स्वस्त धान्य दुकानात ४० रूपये आहे. क्विंटलमागे दीड हजार रूपयांचा नफा मिळतो. कमी वेळात अधिक नफा मिळविण्यासाठी हा गोरखधंदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तूरडाळ मिळाली नाही, अशी तक्रार अजूनही नाही. हा काय प्रकार आहे, हे कसे घडले, याची चौकशी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर थेट कारवाई होईल.
- शालीग्राम भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ