जिल्ह्यात रस्त्यांची हजारो कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:27 PM2018-01-21T23:27:12+5:302018-01-21T23:27:23+5:30
जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी एक हजार ४३ कोटी, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी एक हजार १६० कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी एक हजार ८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी एक हजार ४३ कोटी, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी एक हजार १६० कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी एक हजार ८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात रस्त्यांची हजारो कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
वणी येथे राष्ट्रीय महामार्ग ९३०, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी ओव्हरब्रीजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.डॉ.अशोक उईके, राजू तोडसाम, माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक एम.चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा शहराध्यक्ष रवी बेलूरकर उपस्थित होते. यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात दहा हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहे. वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ना.गडकरी यांनी सांगितले.