बालकांच्या मृत्यूप्रकरणी हजारो विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:25 PM2018-09-11T22:25:37+5:302018-09-11T22:27:19+5:30
तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तीन निरागस बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन मंगळवारी पांढरकवडा शहरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. काढण्यात आलेल्या मुकमोर्चात शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
सिद्धेश मोगरकर, संचेतन राठोड व आदर्श राठोड या तिघांचा रविवारी येथील राधेनगरी परिसरातील खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र या कारवाईने पांढरकवडावासीयांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मंगळवारी शहरातून मुकमोर्चा काढण्यात येऊन मृत बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा फलक हाती घेऊन शिस्तीने हा मुकमोर्चा सकाळी १०.३० वाजता मित्र मंडळाच्या क्रीडांगणावरून निघाला. शहरातील बिरसा मुंडा चौक, डायमंड चौक, मेन चौक, तहसील चौकमार्गे पुन्हा मित्र क्रीडा मंडळाच्या मैदानावर पोहोचला. याठिकाणी मृत सिद्धेश मोगरकर, आदर्श राठोड व संचेतन राठोड या बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरवासीयांतर्फ गुरूकुलचे प्राचार्य विजय देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दोषींवर कडक कारवाई करा : एसडीओंना निवेदन
मुकमोर्चाचा समारोप झाल्यानंतर एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी एस.भुवनेश्वरी यांना निवेदन दिले. तीन बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. खड्डा खोदणाऱ्या बांधकाम कंपनीच्या मालकावर पोलिसांनी ३०४ अ हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाला किरकोळ प्रकरण बनविले असल्याचा उल्लेख सदर निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणात कंत्राटदारावर ३०४ भाग २ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व उद्भवणाऱ्या परिस्थितीला आपण स्वत: जबाबदार राहाल, असा इशारा या निवेदनातून दिला आहे.