झरीतील अनेक गावांवर घोंगावतेयं पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:35 PM2018-03-07T23:35:52+5:302018-03-07T23:35:52+5:30

झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.

Threatened water shortage crisis on many villages in the valley | झरीतील अनेक गावांवर घोंगावतेयं पाणीटंचाईचे संकट

झरीतील अनेक गावांवर घोंगावतेयं पाणीटंचाईचे संकट

Next
ठळक मुद्देनागरिकांचे होणार हाल : उपाययोजनांसाठी प्रशासनाची धडपड

ऑनलाईन लोकमत
झरी : झरी तालुक्यातील अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट असून त्यामुळे यंदा पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल होणार आहेत.
या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तालुक्यातील नदी, नाले, विहिरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई नसली तरी मार्चअखेर व एप्रिल महिन्यात पाणी टंचाईला काही गावांना तोंंड द्यावे लागणार आहे. पाणी टंचाई संदर्भात अजुनपर्यंत कुठल्याही गावचा प्रस्ताव आला नाही. निर्माण होणाºया समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमचा विभाग सज्ज आहे, असे गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
झरी तालुक्यातील सावळी, गाडेघाट, रायपूर, झमकोला, निंबादेवी खुर्द, मुकुटबन, नवीन हिरापूर, बैलमपूर, मांडवा ही संभाव्य पाणी टंचाईची गावे आहेत. हिरापूर या गावात नळयोजना सुरू आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. या गावांमध्ये पाण्याचा अन्य स्त्रोत नाही.
पाटण येथे नदीवरून दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा सुरू आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणी पुरवठा ठप्प होतो. पैनगंगेचे ही पाणी आटण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये पाणी समस्या जटील बनणार आहे. गारगोटी या ५०० लोकसंख्येच्या वस्तीत दोन बोरवेल आहेत. त्यांपैकी एका बोरवेलला पाणी कमी आहे. येथे सोलरपंप होता, तो बंद पडला आहे.
झरी येथे आता नगरपंचायत झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असताना पाण्यासंदर्भात समाधानकारक व्यवस्था न केल्यामुळे आता नगरपंचायती पुढे मोठे आव्हान आहे. १४ व्या वित्तयोजनेअंतर्गत वॉर्ड नंबर ९ ते १७ मध्ये पाईपलाईनचे काम सुरू आहे. वॉर्ड ३,४,८ मधील कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून लवकरच कामाला सुरूवात होईल, असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूनम कळम्बे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिरोला हे गाव याच नगरपंचयतीअंतर्गत असून त्या गावचा पाणी प्रश्ना सोडविण्यासाठी मांगुर्ला या गावातून पाईपलाईनने मांगुर्ला येथे पाण्याची व्यवस्था केली आहे.
झरी व शिरोला येथे जलशुद्धीकरणाची व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी पैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा करावा लागणार आहे. या संदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे नगराध्यक्ष मंदा सिडाम यांनी सांगितले. यासाठी १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३६ गावांत बोअरवेलचे काम पूर्ण
पाणी टंचाईची धास्ती घेऊन अडेगाव, डोंगरगावसह एकूण ३६ गावांत १४ व्या वित्त आयोगातून विंधन विहिरी तयार करण्यात येऊन काही प्रमाणात समस्या शिथिल करण्यात आली आहे. मात्र मेमध्ये या गावांनाही पाणी समस्या भेडसावणार आहे. झरी तालुक्यातील दाभाडी, मांडवा ही गावे नेहमी पाणी टंचाईग्रस्त होती. मांडवा या गावाने यापूर्वीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कारदेखील घातला होता. यावर्षी मांडवा या गावात एम.आर.जी.एसअंतर्गत दोन बोरवेल तयार करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये या बोरवेलचे पाणी आटले तर गावाबाहेरच्या विहिरीतला गाळ उपसून त्यातून एखादी टाकी बसवून त्यातून पाणी सप्लाय करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

Web Title: Threatened water shortage crisis on many villages in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी