चूक कोणाची.. शिक्षा कोणाला? फुलसावंगीत १५ मिनिटात तीन अपघात; सात वर्षीय मुलाचा पाय निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 04:50 PM2022-05-18T16:50:16+5:302022-05-18T16:53:20+5:30
रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी एकदिशा वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक वळविण्याकरिता मोठमोठे दगड ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी ते दृष्टीस पडत नाही. हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे.
फुलसावंगी (यवतमाळ) : रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक वळविण्याकरिता ठेवलेल्या दगडावर आदळून केवळ १५ मिनिटात तीन अपघात झाले. मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनांमध्ये सहा जण जखमी झाले आहेत. एका सात वर्षीय मुलाचा पाय निकामी झाला आहे.
फुलसावंगी येथे बसस्थानकाजवळ सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. वर्षभरातच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहे. या विषयी ओरड सुरू झाल्याने रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी एकदिशा वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक वळविण्याकरिता मोठमोठे दगड ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी ते दृष्टीस पडत नाही. हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे.
मंगळवारी रात्री तीन दुचाकी अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या फरकाने या दगडावर आदळल्या. हिंगणी येथील दत्ता आवळे, त्यांची पत्नी व दोन मुले दुचाकीने गावी निघाले होते. रस्ता कामासाठी ठेवलेले दगड दृष्टीस न पडल्याने त्यांची दुचाकी त्यावर आदळली. यामध्ये कृष्णा दत्ता आवळे (७) याचा पाय मोडला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली.
चिल्ली (ई) येथील दादाराव खंदारे व त्यांच्या पत्नी दुचाकीने गावी जात होते. त्यांचे वाहन दगडावर आदळल्याने दोघेही जखमी झाले. फुलसावंगी येथील विष्णू सुरेश जाधव (२२)यांच्या वाहनालाही अपघात झाला. केवळ वेळ मारून नेण्याच्या प्रकारामुळे या घटना घडल्या. वास्तविक वाहतूक वळविण्याकरिता रेडियम लावलेले बोर्ड त्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराला त्याची गरज वाटली नाही.
काम सुरू असलेल्या ठिकाणी बोर्ड लावले होते. कुणी तरी ते पाडले असे कंत्राटदार म्हणाला. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही बाजूंनी बोर्ड लावण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहे.
- मेहूल भदर्गे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महागाव