टीबी हॉस्पिटलच्या तीन एकर जागेचे अखेर हस्तांतरण होणार
By admin | Published: August 5, 2016 02:29 AM2016-08-05T02:29:15+5:302016-08-05T02:29:15+5:30
शहराच्या मध्यवस्तीतील टीबी हॉस्पिटलची तीन एकर जागा महसूल विभागाला हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश ...
शासनाचा आदेश जारी : व्यापारी संकूल उभारण्याचा मार्ग मोकळा
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीतील टीबी हॉस्पिटलची तीन एकर जागा महसूल विभागाला हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश बुधवार, ३ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेवरील प्रस्तावित व्यापार संकूल, निवासी-शॉपिंग कॉम्पलेक्स, समाज कल्याण विभागाचे वसतिगृह उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
यवतमाळातील टीबी हॉस्पिटलची ही जागा आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताब्यात होती. बांधकाम खात्याकडील नोंदीनुसार १९९० पासून या जागेवर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि मेन हॉस्पिटल दर्शविण्यात आले आहे. सध्या या जागेवर क्षय रुग्णालय व हिवताप कार्यालय, प्रयोगशाळा, शासकीय निवासस्थाने आहे. १६ हजार ५७५.४० चौरस मीटर अर्थात ३.७ एकर या जागेवर २० हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले आहे. १९९८ ला नगर रचना विभागाने विकास आराखडा तयार केला.
त्यानुसार तेथे यवतमाळ नगरपरिषदेने व्यापार संकूल, निवास संकूल आणि वसतिगृह बांधण्याचा मानस व्यक्त केला होता. याच प्रस्तावित कामासाठी ही जागा दर्शविण्यात आली होती. परंतु गेल्या १८ वर्षांपासून या जागेचे हस्तांतरण विविध कारणांनी रखडले होते. अखेर ३ आॅगस्ट रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने ही तीन एकर जागा महसूल व वनविभागाला हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केला. या विभागाकडून ही जागा यवतमाळ नगरपरिषदेला हस्तांतरित केली जाणार आहे. जागा हस्तांतरणामुळे या तीन एकर क्षेत्रात लवकरच शॉपिंग कॉम्पलेक्स उभारण्याची कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही याच परिसरात होणार असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)