यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे साडेतीन हजार काेंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:42 AM2021-01-20T11:42:56+5:302021-01-20T11:43:20+5:30
Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे ख्वाजा गरीब नवाब पाेल्ट्री फार्म येथील गावरान व ब्रॉयरल प्रजातीच्या ३ हजार ७०० काेंबड्यांचा साेमवारी रात्री मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगतच्या सावरगड येथे ख्वाजा गरीब नवाब पाेल्ट्री फार्म येथील गावरान व ब्रॉयरल प्रजातीच्या ३ हजार ७०० काेंबड्यांचा साेमवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तीन किलाेमीटर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाेल्ट्री व्यावसायिक माे. अमीन साेंलकी यांच्या मालकीचा हा फार्म आहे . त्यांचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती स्थानिक पशुचिकित्सकांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून याची सूचना वरिष्ठांना दिली. यामुळे गावात पथक दाखल झाले. या पथकाने तत्काळ मृत काेंबड्यांचे नमुने गाेळा केले. त्यानंतर खाेल खड्डा करून त्यांना पुरण्यात आले. आता गावातील इतरही पक्ष्यांवर पशुचिकित्सकांचा ‘वाॅच’ आहे. पक्ष्यांमध्ये काेणतेही बदल आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे ग्रामस्थांना सांगितले.
काेंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शाेध घेतला जात आहे. त्यासाठी मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तेथून हे नमुने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भाेपाळच्या प्रयाेगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यानंतरच काेंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल. ताेपर्यंत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घाेषित झाला आहे.
सतर्कता बाळगा, घाबरण्याचे कारण नाही
अचानक काेंबड्यांचा मृत्यू झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. यापूर्वी केळापूर तालुक्यातील लिंगटी येथे अशाच पद्धतीने काेंबड्यांचा मृत्यू झाला हाेता. तेथील नमुने भाेपाळ प्रयाेगशाळेत तपासण्यात आले. त्याचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. लिंगटी येथे बर्ड फ्लू नसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक आजारानेच काेंबड्यांचा मृत्यू झाला हाेता. याेग्य औषधोपचारानंतर अनेक पक्ष्यांचे प्राण वाचविता आले. आता तेथील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. सावरगड येथील स्थिती लवकरच नियंत्रणात येइल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बलदेव रामटेके यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.