आर्णी वनपरिक्षेत्रात तीन अस्वलांचा हल्ला
By admin | Published: March 30, 2017 12:05 AM2017-03-30T00:05:24+5:302017-03-30T00:05:24+5:30
दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रामधील कक्ष क्रमांक दोनमध्ये तीन अस्वलांनी एका शेतकऱ्यावर हल्ला केला.
शेतकरी जखमी : वन विभागाकडून मदत
सावळीसदोबा : दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रामधील कक्ष क्रमांक दोनमध्ये तीन अस्वलांनी एका शेतकऱ्यावर हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला.
सत्तू मारोती आडे (६०), रा. पाळोदी, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. सत्तू आडे बुधवारी सकाळी शेतात जात होते. गावापासून एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर दक्षीण आर्णी वनपरीक्षेत्रात येणाऱ्या जंगलात त्यांच्यावर अचानक तीन अस्वलांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मदत करण्यासाठी जंगलात कुणीही नव्हते. ते जखमी अवस्थेतच सुसाट वेगाने गावाकडे पळत सुटले. गावालगतच्या तलावावर मासोळी पकडणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना सावळीसदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी हिंगे, सहायक वनसंरक्षक विपुल राठोड, वनपरीक्षेत्र अधिकारी टी. के. लाकडे यांनी यवतमाळचे शासकीय रूग्णालय गाठून त्यांची विचारपूस केली. त्यांनी वन विभागातर्फे जखमीला रोख १० हजारांची मदत प्रदान केली. (वार्ताहर)