१०० मीटरमध्ये तीन बंधारे
By admin | Published: July 22, 2014 12:05 AM2014-07-22T00:05:21+5:302014-07-22T00:05:21+5:30
एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर
ठाणेगाव : कृषी विभागाच्या धोरणामुळे शासनाच्या निधीला चुना
अब्दुल मतीन - पारवा
एखाद्या वस्तूची उपयोगिता किती यानुसार त्याचे निर्माण अपेक्षित असते. तसे नियोजनही केले जाते. मात्र कृषी विभागाने यावर कळस केला आहे. लगतच्या ठाणेगाव येथील छोट्याशा नाल्यावर केवळ १०० मीटरमध्ये तीन सिमेंट बंधारे बांधले. या विभागाने सदर गावावर एवढी ‘उदारता’ दाखविण्यामागे काय कारण असावे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाणेगाव या छोट्याशा गावातून दोन नाले वाहतात. यापूर्वी एका नाल्यावर दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांचा उपयोग किती होतो याची माहिती या विभागाला नाही. एवढ्यावरच हा विभाग थांबला नाही तर दुसऱ्या एका नाल्यावर केवळ १०० मीटर अंतरात तीन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. जंगलाला लागून वाहणाऱ्या या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा उपयोग किती शेतकऱ्यांना होईल याचा कुठलाही हिशेब या विभागाकडे नाही. मात्र बंधारे बांधून केवळ शासनाच्या निधीला चुना लावला गेला.
या विभागाने बंधारे बांधले हे खरे मात्र त्याचा दर्जा तपासण्याची तसदी कुणीही घेतली नाही. या कामासाठी सिमेंटचा वापर अत्यल्प करण्यात आला. रेतीही नाल्याची उपयोगात आणली. बांधकाम झाल्यानंतर पाण्याचा आवश्यक तेवढा वापर झालेला नाही. परिणामी या बंधाऱ्याच्या आयुष्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाचे हजारो रुपये या कामावर खर्च करण्यात आले. त्याची उपयोगिता अद्याप स्पष्ट झाली नसली तरी निकृष्ट काम झाले, हे मात्र अनेक बाबींवरून दिसून येते. त्यामुळे या बंधाऱ्याच्या निर्मितीचा उद्देश नेमका काय असावा, हा प्रश्न कायम आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी चौकशी केल्यास अनेक बाबी पुढे येऊ शकतात. या दृष्टीने परिसरातील लोकप्रतिनिधींनीही हा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे.