मध्यरात्री तीन बसेसची तोडफोड
By admin | Published: June 2, 2014 01:48 AM2014-06-02T01:48:56+5:302014-06-02T01:48:56+5:30
‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारे लावत दुचाकीवरुन आलेल्या सहा ते सात तरुणांनी ..
यवतमाळ : ‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारे लावत दुचाकीवरुन आलेल्या सहा ते सात तरुणांनी एका आईस्क्रिम पार्लरवर दगडफेक केली. त्यानंतर बसस्थानकात शिरून दोन बसेसच्या काचा फोडल्या. त्यातीलच एका बसवर रॉकेल ओतून जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर दारव्हा नाक्यावर एक बस अडवून तोडफोड करण्यात आली. ३१ मेच्या रात्री ११ वाजतापासून सुरू झालेल्या या घटनांनी संपूर्ण शहरातच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वडगाव रोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जाजू चौकातील एका आईस्क्रिम पार्लरसमोर रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास चार दुचाकीवरून तरुणांचे टोळके आले. नारेबाजी करीत या तरुणांनी आईस्क्रिम पार्लरवर दगडफेक केली. या वेळी पार्लरचालक आणि नोकरांनी प्रसंगावधान राखून तत्काळ शटर खाली ओढले. त्यामुळे नुकसान टळले. त्यानंतर या टोळक्याने बसस्थानकाकडे आपला मोर्चा वळविला. आतमध्ये शिरून गंगापूर आगाराची औरंगाबाद - यवतमाळ मुक्कामी बस (एमएच-२0-बीएल-२७९३) वर या टोळक्याने दगडफेक केली. त्यामध्ये संबंधित बसच्या समोरील काचा फुटल्या. या घटनेनंतर बाजूलाच असलेल्या नेर आगाराच्या बस (एमएच-४0-एन-८१२६) वर देखील दगडफेक केली. त्यामध्ये संबंधित बसच्या समोरील काचा फोडल्या. त्यानंतर टोळक्याने रॉकेल ओतून ही बस जाळण्याचा प्रयत्न केला. ही बाब प्रवाश्यांच्या लक्षात आली. ते टोळक्याकडे धावले. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण तेथून भरधाव पसार झाले. तेथून ते दारव्हा मार्गावर गेले. या वेळी दारव्हा नाका परिसरात नागपूर-दारव्हा या धावत्या बस (एमएच-४0-एन-८५६९) वर टोळक्याने अचानक दगडफेक केली. चालकाने प्रसंगावधान राखून वाहन नियंत्रित केले. तसेच दगडफेक थांबेस्तोवर प्रवासी आणि चालक-वाहक बसमध्येच दडून राहिले. त्यानंतर टोळके तेथूनही पसार झाले. या तीनही घटनांची माहिती यवतमाळ शहरात वार्यासारखी पसरली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन विविध अफवांना पेव फुटले होते. टोळक्याच्या या घटनाक्रमानंतर पोलीस खडबडून जागे झाले. वडगाव रोड, यवतमाळ शहर, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली कमांडो आदी पथक रस्त्यावर उतरले. त्यामुळे संपूर्ण शहरालाच छावणीचे स्वरुप आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)