शाळा सोडून तीन मुलांची अंध वडिलांसह भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:27 PM2017-12-22T22:27:11+5:302017-12-22T22:27:50+5:30
गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे.
अविनाश खंदारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. उमरखेडमधील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार झाले, पण दु:खात साथीदार कोणीही झाले नाही. भिक्षा देऊन उपकाराचा आव अनेकांनी आणला. पण शिक्षण देऊन या मुलांना सर्वशिक्षा अभियानाच्या गंगेत आणण्याचा विचारही कुणाच्या मनात आलेला नाही.
दहा वर्षांपूर्वी चुरमुरा तांडा येथील एका उमेदीच्या तरुणावर नियतीची कुऱ्हाड कोसळली. विलास फकिरा राठोड हा तरुण रोजमजुरी करत आनंदाने जगत होता. पत्नी संगीताची समर्थ साथ होती. अनिल, राहुल आणि नितीन या तीन मुलांच्या रूपाने त्यांच्या जीवनात आनंद पसरला होता. पण अचानक विलासची दृष्टी गेली. सारथीच अंध झाला म्हटल्यावर पत्नी संगीता पूर्णपणे खचली. लाडक्या लेकरांना आता शिकवायचे कसे? जगवायचे तरी कसे? काहीही झाले तरी पतीची दृष्टी परत आणायचीच हा चंग संगीताने बांधला. गळ्यातले मंगळसूत्र, इतर थोडे दागिने, पाळलेल्या बकऱ्या असे सारे होते नव्हते ते विकून टाकले. विलासला नागपूर, नांदेड, औरंगाबादला नेऊन नेत्रतज्ज्ञांना दाखविले. शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च केला. आता घरात काहीच उरले नाही. थकलेल्या संगीताने लोकप्रतिनिधींच्याही भेटी घेतल्या. पण निगरगट्ट लोकांनी साथ दिली नाही. संगीता शेतमजुरी करून अंध पती आणि तीन लेकरांचा उदरनिर्वाह करू लागली. त्यात काय भागणार? अखेर तिन्ही मुलं अंध पित्यासोबत उमरखेडला भिक मागू लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांची जिंदगी अशीच भिक्षेवर सुरू आहे. ही छोटी मुले शाळेत का जात नाही, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. फक्त तुम्ही काय रे रोजच मागायला येता म्हणत लोक त्यांच्या अंगावर धावून जातात. मेहनत करूनच जगण्याची सवय असलेल्या माणसाला मागून खाण्याची वेळ येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते! तेच शल्य विलासचे मन कुरतडत असते. मोत्यासारखी तीन मुले असताना त्यांना शाळेत पाठवू शकत नाही, ही बोच तर जीवघेणीच. संगीता सध्या उसतोडणीच्या मजुरीला गावोगावी फिरत आहे. ताटातूट झालेल्या या संसाराला सावरण्यासाठी एकही सामाजिक कार्यकर्ता, संस्था सरसावली नाही, हे विशेष.
झोपडीचा महाल नको घरकूल द्या!
विलास व त्याची पत्नी संगीता तीन मुलांसह १० वर्षांपासून चुरमुरा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका झोपडीतच राहतात. पावसाळ्यात या झोपडीत पूर्ण पाणी साचते. राहण्यासाठी जागाच उरत नाही. हे कुटुंब घरकुल मिळावे म्हणून कागदपत्र देऊन शासकीय कार्यालयांमध्ये येरझारा घालत आहे. मात्र वर्षानुवर्षे त्यांच्या हेलपाटाच सुरू आहे. कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
परमेश्वराने तर माझ्यावर अन्याय केलाच; परंतु शासकीय यंत्रणाही दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दिव्यांगांना ज्या सुविधा दिल्या आहेत, त्याचा कुठलाच लाभ आम्हाला मिळत नाही. माझ्या मुलांना मी पाहू शकत नाही, हे माझे दुर्दैव. लहान मुलाला तर मी जन्मापासून कधीच पाहू शकलो नाही. त्यांना शाळेत पाठवायचे आहे. पण ते शाळेत गेले तर खाणार काय?
- विलास राठोड, चुरमुरा तांडा