भूमाफियांविरूद्ध अखेर पोलिसात तीन तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:38 PM2018-07-11T21:38:05+5:302018-07-11T21:40:18+5:30
शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर व परिसरातील बेवारस भूखंड परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात पोलिसांकडे अखेर तीन तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती असून त्यात दूध विक्रेत्याचाही समावेश आहे. त्याद्वारे भूमाफियांशिवाय आणखी कुणा-कुणाविरोधात गुन्हे दाखल होतात, याकडे नजरा लागल्या आहेत.
यवतमाळ शहरात बेवारस भूखंडांची संख्या बरीच आहे. या भूखंडांचे मालक बाहेरगावी राहतात, वर्षानुवर्षे यवतमाळात येत नाहीत. असे भूखंड प्रॉपर्टी ब्रोकर्सने हेरुन भूमाफियांना त्याची माहिती दिली. या माफियांनी खोटे विक्रेते, खरेदीदार उभे करून संबंधित तमाम शासकीय यंत्रणेला हाताशी धरत या भूखंड विक्रीचे व्यवहार केले. हेच भूखंड किंमत वाढवून येथील काही बँकांमध्ये तारण ठेवले गेले. त्यावर कोट्यवधींचे कर्ज उचलून हिस्सेवाटणी केली गेली. या कर्जातील काही वाटा बँकांमधील संबंधित आॅथिरीटींनासुद्धा मिळाल्याचे सांगितले जाते.
भूमाफियांच्या या टोळीत एका राकेशने महत्वाची भूमिका वठविली. तो काही महिन्यांपासून चार ते पाच कोटी रुपये घेऊन फरार असल्याचे सांगितले जाते. याच राकेशने शहरातील एका नामांकित दूध विक्रेत्यासह बँकेलाही संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळ्यांच्या विक्रीप्रकरणात चुना लावला. अखेर या दूध विक्रेत्याने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. याशिवाय आणखी दोन तक्रारदार पोलिसांपुढे आल्याचे सांगितले जाते. पोलीस अनेक दिवसांपासून या प्रकरणावर वॉच ठेऊन आहे. आतापर्यंत बरीच चौकशीही झाली आहे. आता प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आणखी किती वेळ घेतात याकडे नजरा लागल्या आहेत. राकेशला फसवणुकीचा हा मार्ग दाखविणारा त्याचा साथीदार तर राकेशपूर्वीच फरार झाल्याचे सांगण्यात येते.
५० लाखांच्या प्रॉपर्टीवर चक्क सहा कोटींचे कर्ज
बेवारस भूखंड विक्रीच्या या व्यवहारात काही बँका सहभागी आहेत. काही प्रकरणात मालकांचे कन्सेन्ट आहे. तर काही प्रकरणात तेथील अधिकाºयांनी मालकांना अंधारात ठेऊन स्वत:च मलिदा लाटला आहे. ‘नदी’च्या नावाने चर्चेत असलेल्या एका बँकेने दोन भूखंडांवर तीन-तीन कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. वास्तविक त्या भूखंडांची खरेदी किंमत अवघी २५ लाख आहे. ५० लाखांच्या दोन भूखंडांना चक्क सहा कोटींचे कर्ज मंजूर केले गेले आहे. अडीच टक्के प्रोसेसिंग फी आणि दहा टक्के शेअर्स या अटीवर हे कर्ज दिले गेले आहे. दरदिवशी १५ ते २० हजार परतावा (कर्ज परतफेड) या पद्धतीने हे कर्ज देण्यात आले. काही महिने हे कर्ज नियमित भरले गेले. मात्र आता ते थकीत झाले आहे. तेवढी प्रॉपर्टीच तारण नसल्याने या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे. बँकींगचा दीर्घ अनुभव असलेल्या अधिकाऱ्याने हे कर्ज मंजूर केले. सदर अधिकारी आता दोन बँका एकत्र करून स्वत:ची स्वतंत्र बँक काढण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जाते. याच बँकेतून अशी आणखीही कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहे. अशाच पॅटर्ननुसार अन्य काही बँकांनीही दिलेले कर्ज वांद्यात सापडले आहेत. संबंधित शासकीय आॅथिरीटीने प्रामाणिकपणे आॅडिट केल्यास जनतेच्या पैशांचा हा घोळ सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही.
विदेशात वास्तव्य असणाऱ्यांचे भूखंड हेरले
भूमाफियांनी बेवारस भूखंडांची बोगस खरेदी-विक्रीसाठी निवड करताना शक्यतोवर मालक दूर कोठे तरी असेल याला प्राधान्य दिले. दोन डझनावर भूखंडांचे या माफियांनी व्यवहार केल्याचे बोलले जाते. यातील बहुतांश भूखंडांचे मालक विदेशात राहत असल्याचेही सांगितले जाते. ते तक्रार देण्यासाठी येथे प्रत्यक्ष येण्याची तसदी घेणार नाही, असेच भूखंड निवडण्यात आले. मात्र या मालकांना आॅनलाईन फिर्याद देण्याचा पर्यायही सूचविण्यात आल्याची माहिती आहे.