समाजकल्याणचे तीन कोटी रुपये गेले परत
By admin | Published: May 25, 2016 12:02 AM2016-05-25T00:02:14+5:302016-05-25T00:02:14+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी बीडीएस प्रणालीवर आलेले तीन कोटी रुपये परत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जिल्हा परिषद : वसतिगृहातील आठ हजार विद्यार्थी वाऱ्यावर
यवतमाळ : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी बीडीएस प्रणालीवर आलेले तीन कोटी रुपये परत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध वसतिगृहातील आठ हजार विद्यार्थी वाऱ्यावर आहे. या प्रकाराबाबत पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांनी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह चालविले जाते. त्यासाठी संस्थांना प्रति विद्यार्थी ९०० रुपये प्रमाणे अनुदान दिले जाते. समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह अनुदानासाठी दहा कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी तीन कोटी ४४ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. ही रक्कम बीडीएस प्रणालीवर आल्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी खात्यात वळती करुन घेणे आवश्यक होते. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी ही रक्कम शासन जमा झाली. मार्च २०१५ पासून ते मे २०१६ पर्यंत वसतिगृहांसाठी एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे वसतिगृह चालक विद्यार्थ्यांना कोणतीच सुविधा देत नाही. अतिशय बिकट परिस्थितीत या विद्यार्थ्यांना येथे रहावे लागत आहे.
पुणे येथे नुकतीच समाज कल्याण आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीत समाज कल्याण अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची माहिती असून समाज कल्याण आयुक्तांनी याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकाही वस्तूची खरेदी करण्यात आली नाही. बजेटमध्ये प्रस्तावित निधी अखर्चित आहे. निविदा प्रक्रिया झाली, पुरवठा आदेश दिला. त्यावरच भलावन केली जात आहे. समाज कल्याण विभागातील अनागोंदी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्हा परिषद समाज कल्याण आणि अनागोंदी हे समीकरणच झाले आहे. या विभागातून अनेक योजना चालविल्या जातात. परंतु येथील वेळ काढू धोरण लाभार्थ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह अनुदानाप्रमाणेच शिष्यवृत्तीसुद्धा मिळालेली नाही. शैक्षणिक सत्र संपून दोन महिने झाले तरी कोणीच दखल घ्यायला तयार नाही. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक सत्रात तीन वेळा वाटप करण्याचे निर्देश आहे. मात्र समाज कल्याण अधिकाऱ्यांनी एकदाही शिष्यवृत्ती दिलेली नाही.
वसतिगृह अनुदानाची रक्कम ३१ मार्च रोजी उशिरा बीडीएस प्रणालीवर आली. तांत्रिक अडचणीमुळे लिंक कॅरी फॉरवर्ड करता आली नाही. त्यामुळे पैसे परत गेले. याबाबत आयुक्तांनी केलेल्या विचारणेला उत्तरही देण्यात आले आहे. आता अनुदानाचे एक कोटी रुपये आले असून थकबाकी देणे सुरू आहे.
- जया राऊत
समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद