तीन भाविक ठार, ११ गंभीर
By admin | Published: April 9, 2017 12:44 AM2017-04-09T00:44:52+5:302017-04-09T00:44:52+5:30
देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दोन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर ११ जण जखमी झाले.
दोन वेगवेगळे अपघात : मृत फुलसावंगी आणि जेवलीचे
वणी/ पुसद : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दोन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर ११ जण जखमी झाले. वणी-चारगाव मार्गावर झालेल्या कार अपघातात महागाव तालुक्यातील फुलसावंगीचे दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. तर वाशिम जिल्ह्यातील फुलउमरीजवळ झालेल्या आॅटोरिक्षा अपघातात उमरखेड तालुक्यातील जेवली येथील एक तरुण ठार तर सात जण जखमी झाले.
महागाव तालुक्यातील सोनवणे परिवार चंद्रपूरच्या महाकाली देवीच्या दर्शनासाठी शनिवारी स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच २९ आर ५९९९) जात होते. वणी तालुक्यातील चारगाव मार्गावर पेट्रोल भरण्यासाठी समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे मागाहून जाणारी कार या ट्रक वर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णत: चुराडा झाला. यात किसन धोंडबा गवळी (७०), भगवान उकंडा सोनवणे (६५) दोघेही रा. फुलसावंगी ठार झाले. तर चंद्रकला भगवान सोनोवणे (४५), साक्षी बालाजी कुळसंगे (५), ज्योती अर्जुन सोनवणे (२५) सर्व रा. फुलसावंगी ता. महागाव गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार भगवान सोनवणे यांचा फुलसावंगी येथे दुधाचा व्यवसाय होता. आठ दिवसापूर्वीच त्यांचा मुलगा अर्जुन सोनवणे याचे लग्न झाले होते. त्यामुळे सहकुटुंब आपल्या मालकीच्या कारने चंद्रपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन सर्वांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. किसन गवळी यांना मृत घोषित करण्यात आले तर भगवान सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना चंद्रपूर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दुसरा अपघात वाशिम जिल्ह्यातील फुलउमरी गावाजवळ घडला. उमरखेड तालुक्यातील जेवली येथील भाविक आॅटोरिक्षाने (क्र. एमएच २९ डब्ल्यू ९३३८) पाळोदी (ता. मानोरा) येथे मारूतीच्या दर्शनासाठी जात होते. फुलउमरी गावाजवळ आॅटोरिक्षा उलटला. त्यात नंदलाल मानसिंग नोळे (२३) रा. जेवली हा ठार झाला तर गोपाल नोळे, ईश्वर भेलके, शारदा भेलके, सुनीता नोळे, रामेश्वर गवई, सकीयाबाई कटारे, अंकुश जाटवे जखमी झाले. जखमींना तात्काळ पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आॅटोरिक्षा चालक मंगलसिंग तरारे रा. जेवली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (लोकमत चमू)
जखमींमध्ये नवदाम्पत्यासह पाच वर्षीय चिमुकली
अर्जून सोनवणे याचा विवाह १५ दिवसांपूर्वीच झाला होता. ते पत्नीसह देवीच्या दर्शनासाठी चंद्रपूर येथे जात होते. वणीजवळ कार ट्रकवर आदळल्याने झालेल्या या अपघातात हे नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कार अर्जूनच्या मालकीची असून तोच स्वत: चालवित असल्याची माहिती आहे. या अपघातात त्यांच्यासोबत साक्षी बालाजी कुळसंगे ही पाच वर्षीय बालिकाही जखमी झाली. या अपघाताचे वृत्त फुलसावंगी येथे धडकताच नातेवाईकांनी वणीकडे तर गावातील नागरिकांनी सोनवणे यांच्या घराकडे धाव घेतली.