जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:22 PM2018-05-29T22:22:33+5:302018-05-29T22:22:42+5:30
जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तीन विविध घटनांत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू तर दोन बालिका अत्यवस्थ झाल्याची घटना मंगळवारी घडली. उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीत बुडून एक बालिका, दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून विद्यार्थी तर पुसद तालुक्याच्या बान्शी येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
उमरखेड तालुक्यातील बारा येथे पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या रुपाली उकाजी उखळे (१२) या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तर कांचन संजय उखळे (११), नेहा पांडुरंग सुरोशे (१६) असे अत्यवस्थ झालेल्या बालिकांची नावे आहे. या दोघींवरही नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मंगळवारी तीन मुली कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी कपडे धुताना रुपालीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कांचन आणि नेहाही पाण्यात उतरल्या. मात्र पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. दरम्यान हा प्रकार नदीवर असलेल्या इतर महिलांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले. तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र रुपालीचा मृत्यू झाला तर कांचन आणि नेहा बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना प्रथम उमरखेड व नंतर नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात बुडून तुषार महादेव मात्रे (१८) रा. कारखेडा ता. मानोरा जि. वाशिम याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. तो तालुक्यातील चिंचोली येथे आजोबा जयराम काळे यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. नुकतीच १२ वीची परीक्षा त्याने दिली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजता तो मित्रांसोबत अरुणावती धरणावर पोहण्यासाठी गेला. चौघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र तुषार बाहेरच आला नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. परंतु रात्र झाल्याने शोध लागला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी १० वाजता त्याचा मृतदेह धरणातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तीन घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली.
बान्शी येथे शेतकरी विहिरीत पडला
पुसद तालुक्यातील बान्शी येथील शेतातील विहिरीत पडून ब्रिजलाल गरीबसिंग आडे (४०) यांचा मृत्यू झाला. ब्रिजलाल नोकरासह आपल्या शेतात कामासाठी गेला होता. विहिरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. नोकराने आरडाओरडा करून नागरिकांना बोलावून आणले. ब्रिजलालला बाहेर काढले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे साप लागल्याने तो विहिरीवर चढला आणि तोल जाऊन पडल्याची चर्चा गावात आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील आहे.