तोतया पोलीस बनून लुटणारी टोळी जेरबंद, तेलंगणा राज्यातून रकमेसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 03:53 PM2021-11-01T15:53:37+5:302021-11-01T15:56:21+5:30
तोतया पोलीस बनून घराची झडती घेण्याच्या नावावर एकाच्या घरातून घराची दोन लाख रुपये, सहा मोबाईल असा ऐवज उडविणाऱ्या टोळीला राळेगाव पोलिसांनी अटकेत घेतले आहे.
यवतमाळ : तुझ्या घरात गांजा ठेवल्याची माहिती आहे. घराची झडती घ्यावी लागेल असे म्हणून चाैघांनी पोलीस असल्याची बतावणी करून घरझडती घेतली व घरातून दोन लाख रोख व ७४ हजारांचे मोबाईल लंपास केले. राळेगावातील ही घटना पोलिसांनी उघडकीस आणली असून, तीन आरोपींना तेलंगणातून अटक केली आहे.
अच्युतारामा तम्मारेड्डी (२१) हा माथानगर थोडगे ले-आउट येथे राहत होता. तो व्याजाचे पैसे वाटपाचे काम करीत होता. त्याच्या घरी २९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता खाकी पॅन्ट व काळा बूट घातलेले चाैघेजण आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून घराची झडती घेतली. घरातील पेट्यांमध्ये असलेले दोन लाख रुपये, सहा मोबाईल असा ऐवज ताब्यात घेतला. यानंतर ते निघून गेले.
अच्युतारामा तम्मारेड्डी याला संशय आल्याने तो राळेगाव पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे असे कुठलेच पोलीस कारवाईसाठी आले नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्काळ विविध तपास पथक गठित करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. सीसीटीव्ही फुटेज व सायबर सेलकडे असलेल्या तांत्रिक माहितीवरून तपास सुरू झाला. पोलिसांनी तेलंगणातील आदिलाबाद हे शहर गाठून तीन आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली टी.एस. ०७/ई.ई. ७४६३ क्रमांकाची कार व ३० हजार रुपये रोख जप्त करण्यात आली. यातील एक आरोपी अजूनही पसार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, राळेगाव ठाणेदार संजय चाैबे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अमोल मुडे, मोहन पाटील, सायबर सेलचे अमोल पुरी, गोपाल वास्टर, उपनिरीक्षक योगेश रंधे, उल्हास कुरकुटे, सलमान शेख, सुधीर पिदूरकर, किशोर झेंडेकर यांनी केली.
शोध पथकाला २५ हजारांचे बक्षीस
२९ ऑक्टोबरला घडलेला गुन्हा ३१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आणला. तसेच तीन आरोपींना अटक केली. या उत्कृष्ट कारवाईबद्दल तपास पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस व गुड सर्व्हिस टिकेट्स जाहीर केले.