भीषण आगीत वणीतील तीन दुकाने भस्मसात
By admin | Published: March 22, 2017 12:12 AM2017-03-22T00:12:25+5:302017-03-22T00:12:25+5:30
सोमवारी मध्यरात्रीनंतर वणी शहरातील नगरवाचनालय परिसरात असलेली तीन दुकाने आगीत भस्मसात झाली.
मोठी दुर्घटना टळली : साडेचार लाखांचे नुकसान, दुकानातील साहित्य खाक
वणी : सोमवारी मध्यरात्रीनंतर वणी शहरातील नगरवाचनालय परिसरात असलेली तीन दुकाने आगीत भस्मसात झाली. आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
स्थानिक नगरवाचनालय परिसरातील एका गल्लीत एकमेकांना लागून काही घरे व दुकाने आहेत. सोमवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रवी निवलकर यांच्या लाकडी फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत दुकानातील चार दिवाण, दोन सोफासेट, पाच दरवाजे, नऊ खिडक्या, आठ फायबरचे दरवाजे व सागवानी लाकडे असे तीन लाखांचे नुकसान झाले. ही आग भडकत असताना आगीने लगतच्या प्रमोद चांदवडकर यांच्या फोटो फ्रेम दुकानाला विळखा घातला. त्यात फोटोेफे्रमचे साहित्य जळून ५० हजारांचे नुकसान झाले, तर समोर असलेल्या अनवर मेहबूब खान यांच्या सायकल दुरूस्तीच्या दुकानालाही आपल्या कवेत घेतले. त्यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच वणी पालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली अन्यथा परिसरातील घरांनाही आगीपासून धोका निर्माण झाला होता. मात्र मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)