दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

By विलास गावंडे | Published: June 26, 2024 04:30 PM2024-06-26T16:30:32+5:302024-06-26T16:31:16+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील घटना : दोघींचा धुणे धुताना, तर एकाचा वाचविताना मृत्यू

Three, including two girls, drowned in the river | दोन मुलींसह तिघांचा नदीत बुडून मृत्यू

Three, including two girls, drowned in the river

ढाणकी (यवतमाळ) : पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळ करताना दोन मुलींसह त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२६ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सावळेश्वर येथे पैनगंगा नदीपात्रात घडली. कावेरी गौतम मुनेश्वर (१५), अवंतिका राहुल पाटील (१४), चेतन देवानंद काळबांडे (१६), रा.सावळेश्वर, ता.उमरखेड, अशी मृतांची नावे आहे.               

सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेली कावेरी व तिची मैत्रीण अवंतिका या दोघी गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे आटोपल्यानंतर या दोघीही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या. त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. त्यांची आरडाओरडा ऐकू आल्याने याच ठिकाणी असलेले चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम सिद्धार्थ काळबांडे (२२) रा.सावळेश्वर हे दोघे मदतीसाठी धावले.  

या दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली. घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतनला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. शुभमला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. 

चौघांनाही नदीतून बाहेर काढून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केले. शुभम याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.   

आता आई एकटीच राहिली
चेतन देवानंद काळबांडे याच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून चेतनची आई कविता आणि चेतन हे दोघे एकमेकांच्या सहाऱ्याने राहात होते. चेतनचाही अचानक मृत्यू झाल्याने आता त्याची आई एकटीच राहिली आहे. या घटनेमुळे तिच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

Web Title: Three, including two girls, drowned in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.