पुसदला अखेर तीन आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:05 PM2018-07-09T22:05:32+5:302018-07-09T22:06:00+5:30
विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी भाजपानेही पुसदवर लक्ष केंद्रीत करीत बंगल्याला सुरुंग लावताना अॅड. निलय नाईक यांना उमेदवारी दिली. एकापाठोपाठ दोन उमेदवार एकट्या पुसदमधून दिले गेल्याने राज्याच्या राजकारणात पुसदची चर्चा होऊ लागली. अपेक्षेनुसार मिर्झा व नाईक हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडले गेले. कारण ११ जागा व ११ उमेदवार आहेत. १२ व्या उमेदवाराने अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने प्रत्यक्ष मतदानाची वेळ न येता उमेदवार बिनविरोध झाले.
पुसदला राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक हे विधानसभेचे आमदार आहेत. त्यात आता वजाहत मिर्झा व निलय नाईक यांच्या रुपाने आणखी दोघांची भर पडली आहे. या तीन आमदारांवर आता आपला पक्ष गावखेड्यापर्यंत वाढविणे, तो सर्व अंगांनी बळकट करणे व पुसदचा सर्वांगिण विकास साधण्याची जबाबदारी आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुसदमधून त्या-त्या पक्षाला मिळणाºया मतांवर या दोन्ही नव्या आमदारांची राजकीय उपयोगिता मोजली जाणार एवढे निश्चित.
पुसद जिल्हा निर्मीती जबाबदारी वाढली
गेली कित्येक वर्ष पुसद जिल्हा होणार याची चर्चा आहे. मात्र अद्याप पुसदकरांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले नाहीत. पुसदकरांची ही स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदारी आता या तीन आमदारांवर आली आहे. त्यातही निलय नाईक सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक प्रमाणात आल्याचे मानले जाते.
काँग्रेसमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची चर्चा!
सुमारे वर्षभरापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. वजाहत मिर्झा यांना अल्पावधीतच थेट आमदारकी दिली गेली. एक व्यक्ती एक पद या न्यायाने आता डॉ. मिर्झा यांच्या जागी काँग्रेसमध्ये नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल का याची चर्चा जिल्हा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुकही आहेत. मात्र लोकसभा तोंडावर आल्याने जिल्हाध्यक्ष बदलतील की नाही याबाबत नेते मंडळी साशंकता व्यक्त करीत आहेत.