तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद ठप्पच
By admin | Published: April 20, 2017 12:22 AM2017-04-20T00:22:20+5:302017-04-20T00:22:20+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे.
यवतमाळ : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे. विषय समित्यांचे गठन रखडल्याने सर्वच विभागांचा मासीक आढावा गुलदस्त्यात आहे.
जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू झाली. त्याच महिन्यात तत्कालीन काही विषय समितींची शेवटची बैठक झाली. त्यानंतर अद्याप सर्व विभागांची बैठकच झाली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना आचारसंहिता व निवडणुकीत गेला. २३ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर मार्चमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. तोपर्यंत जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीविहीन होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड झाली खरी, मात्र अद्याप समित्यांचे गठन झाले नाही. त्यामुळे दोन सभापती केवळ नाममात्र ठरले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कोणत्याच विभागाची मासिक आढावा बैठक झाली नाही. परिणामी जिल्हा परिषद ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश देणे सुरू केले. मात्र संबंधित विभागांचा मासीक आढावा अद्याप कुणीच घेतला नाही. त्यामुळे सर्वच विभाग प्रमुख निर्धास्त आहे. पुन्हा किमान महिनाभर तरी विषय समितीची मासीक बैठक होण्याची शक्यता नाही. समिती गठनानंतरच ती होणार आहे. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसारच कामकाज चालणार आहे. जिल्हा परिषदेचे संपूर्ण नियंत्रण संपूर्णणे प्रशासनाच्या हाती एकवटले आहे. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रशासनाचे ‘कासरे’ आपल्या हातात ओढण्यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र जोपर्यंत सर्वसाधारण सभा होत नाही, तोपर्यंत प्रशासन वरचढ राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)