तीन खासदार आणि बारा आमदार
By admin | Published: February 12, 2017 12:11 AM2017-02-12T00:11:15+5:302017-02-12T00:11:15+5:30
जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे.
प्रतिष्ठा पणाला : मतदार ठरणार निर्णायक
रवींद्र चांदेकर यवतमाळ
जिल्ह्याला तीन खासदार, विधानसभेचे सात आणि विधानपरिषदेचे पाच, असे १२ आमदार लाभले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या सर्वांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.
अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे. त्यामुळेच जिल्ह्याला हंसराज अहीर, भावना गवळी व अॅड. राजीव सातव, असे तीन खासदार मिळाले. त्यांच्यापैकी अहीर केंद्रात गृहराज्यमंत्री आहे. आमदारांपैकी मदन येरावार पालकमंत्री, डॉ. रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्री, तर संजय राठोड महसूल राज्यमंत्री आहेत. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहे. या सर्वांना लाल दिवे आहे. उर्वरित खासदार, आमदारही दिग्गज आहेत. या सर्वांना येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाला आपली उपयोगिता सिद्ध करून दाखवून द्यावी लागणार आहे.
खासदार, आमदारांच्या बाबतीत सध्या भाजपा आणि शिवसेना सरस आहे. त्यांचेच सर्वाधिक खासदार व आमदार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आमदार आहे. त्यापैकी केवळ ठाकरे यांनाच लाल दिवा आहे. तथापि त्यांना त्याचा पुरेपूर वापर करता येणे शक्य नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक कस लागणार आहे. राष्ट्रवादीला आपला गड राखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहे. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेला ही निवडणूक सोपी आहे. त्यांचे थेट केंद्रापासून ते राज्यापर्यंत मंत्री आहेत. सोबतीला राज्यमंत्री दर्जाचा लालदिवाही आहे. तरीही जिल्हा परिषदेची उमेदवारी बहाल करताना भाजपाला अनेक ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाच आपली उमेदवारी द्यावी लागली आहे.
उरले केवळ पाच दिवस
हे सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवडणुकीत कोणती भूमिका बजावतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाला जेमतेम पाच दिवस उरले आहे. तूर्तास जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. ती उलथून पाडण्यासाठी भाजपा-शिवसेनेला, तर ती कायम ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला व्यूहरचना आखावी लागेल. ग्रामीण भागात चांगला जनाधार लाभलेल्या काँग्रेसला सत्ता कायम राखण्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागेल, एवढे मात्र निश्चित.