घोषणा झाली... राज्य शिक्षक पुरस्कारावर जिल्ह्यातीन तीन नावांची मोहोर
By अविनाश साबापुरे | Published: September 1, 2023 08:16 PM2023-09-01T20:16:57+5:302023-09-01T20:17:24+5:30
शासनाची घोषणा : संदीप कोल्हे, साईनाथ चंदापुरे, दीपक पडोळे मानकरी
यवतमाळ : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शुक्रवारी राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यात प्राथमिक शिक्षक गटातून संदीप मधुकरराव कोल्हे यांची ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. ते कळंब पंचायत समितीमधील कोठा केंद्रांतर्गत सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत खुद्द शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सुकळी शाळेला भेट दिली होती.
माध्यमिक शिक्षक गटातून साईनाथ मारोतराव चंदापुरे यांची निवड झाली आहे. ते उमरखेड येथील गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर या शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या गटातून दीपक वसंतराव पडोळे यांची निवड झाली आहे. ते पांढरकवडा पंचायत समितीमधील केळापूर केंद्रांतर्गत घोन्सी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. यंदा राज्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून १७ प्रस्ताव राज्य स्तरीय निवड समितीकडे गेले होते. विविध उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण या समितीने पाहिल्यानंतर २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची बैठक होऊन राज्यातील १०८ शिक्षकांची नावे पुरस्कारासाठी अंतिम करण्यात आली होती. शुक्रवारी शालेय शिक्षण विभागाने ही नावे ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा’साठी जाहीर केली आहेत. मात्र पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर शिक्षकदिनीच होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही.