तीन जण राखणीसाठी शेतात गेले.. पण त्यातला एक गायब झाला आणि मग पुढे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 02:05 PM2020-07-15T14:05:10+5:302020-07-15T14:06:33+5:30
महागाव तालुक्यातील भांब-पिंपळगाव जंगलातील शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील भांब-पिंपळगाव जंगलातील शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. शंकर दत्ता जाधव (२४) रा.भांब असे मृताचे नाव आहे.
शंकर १३ जुलै रोजी रात्री मोठ्या भावासोबत जागलीसाठी शेतात गेला होता. त्याच्यासोबत एक मित्र असल्याचे सांगण्यात येते. हे तिघेही शेतात झोपी गेले. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास शंकरचा मोठा भाऊ लघुशंकेसाठी उठला असता तो जागेवर आढळला नाही. त्याने मित्राला सोबत घेऊन शंकरचा शोध घेतला. मात्र तो जवळपास कुठेही आढळला नाही. ही बाब त्यांनी कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून शंकरचा शोध सुरू झाला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास भांब-पिंपळगाव जंगल शिवारात शेळ्या चारणाऱ्या एका युवकाला शंकर मृतावस्थेत आढळला. त्याने गावकऱ्यांना माहिती दिली. नंतर पोलीस पाटील व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर मृतदेह शंकरचाच असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आत्माराम दत्ता जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी महागाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. मात्र मृतक शंकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आढळली. तसेच त्याच्या हाताला ईलेक्ट्रीक शॉक दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. ठाणेदार दामोदर राठोड यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. उत्तरीय तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.