तलावात पोहायला गेलेल्या तिघांचा दोन घटनेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 08:26 PM2023-05-13T20:26:49+5:302023-05-13T20:27:39+5:30
Yawatmal News टाकळी तलाव येथे पोहायला गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याच दरम्यान दुपारी २ वाजता कापरा तलावावर पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पोहायला गेले. त्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
यवतमाळ : टाकळी तलाव येथे पोहायला गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी लक्षात आली. शनिवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापन चमूने त्याचा मृतदेह बाहेर काढला. याच दरम्यान दुपारी २ वाजता कापरा तलावावर पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पोहायला गेले. त्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
करण विलास गाडेकर (१४) रा. टाकळी असे टाकळी येथील मृताचे नाव आहे. करण गावातीलच तलावावर पोहण्यासाठी गेला होता. तो उशिरापर्यंत घरी परत आला नाही तेव्हा त्याच्या आईने शोध घेतला असता व तलावावर पोहायला गेल्याची माहिती मिळाली. मात्र त्याचा मृतदेह दिसत नव्हता. ग्रामीण पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या मदतीने करणचा मृतदेह शनिवारी दुपारी बाहेर काढला. यावेळी गावात एकच शोककळा पसरली.
ही घटना होत नाहीच तोच तालुक्यातील किटा कापरा येथे कापरा तलावावर शासकीय पॉलिटेक्निक विद्यालयाचे विद्यार्थी पोहायला गेले. १३ जण तेथे पोहत असताना ऋषभ नितीन बजाज (२०) रा. बाजोरियानगर, सुजल विनायक काळे (२०) रा. नागपूर हे दोघे बुडाले. त्यातील ऋषभचा मृतदेह बाहेर काढता आला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. मात्र सुजलचा मृतदेह तलावातच अडकून होता. त्याला बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन चमू शनिवारी सायंकाळी तेथे पोहोचली. वृत्तलिहिस्तोवर त्याचा शोध सुरू होता. या प्रकरणी वेदांत माई रा. शेगाव ह.मु. पॉलिटेक्निक हॉस्टेल याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास पॉलिटेक्निक हॉस्टेलवरचे १३ मित्र कापरा तलावावर पोहण्यासाठी गेले. तेथे दोघांवर काळाने झडप घातली. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. शहराच्या आजूबाजूचे तलाव, जलाशय धोक्याचे ठरू लागले आहे.