‘कलेक्टर’च्या कक्षासमोर तिघांनी घेतले विष
By admin | Published: April 28, 2017 02:25 AM2017-04-28T02:25:04+5:302017-04-28T02:25:04+5:30
जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून
शेतीच्या ताब्याचा वाद : दारव्हा तालुक्यातील गौतम कुटुंबीय
यवतमाळ : जिल्हा कचेरीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील जमिनीच्या ताब्यावरून त्यांनी विष घेतल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांनी विष घेताच महसूल यंत्रणेत खळबळ उडाली. त्यांना तातडीने वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उन्नन रामचंद्र गौतम (३२), कुंदन रामचंद्र गौतम (३४), आशिष अरुण गौतम (३२) सर्व रा. डोल्हारी देवी, ता. दारव्हा, अशी विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कुटुंबातील पाच एकर शेतीच्या ताब्यावरून दारव्हा येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. यात न्यायालयाने गौतम यांच्याविरूद्ध निकाल दिला होता. तेव्हापासून शेताच्या ताब्यावरून गौतम कुटुंबियांत धुसफूस सुरू होती.
दारव्हा न्यायालयाच्या ८ आॅक्टोबर २०१४ च्या निकालानुसार गंगाबाई इंद्रबाद्दूर ठाकूर (बैस) (५३) रा. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती, यांनी त्यांच्याकडे शेतीचा ताबा मागितला. त्यावेळी ठाकूर यांनी दारव्हा पोलिसांकडे संरक्षणही मागितले होते. मात्र उन्नन, कुंदन व आशिष यांनी विरोध केल्यामुळे त्यांना शेतीचा ताबा घेता आला नव्हता. तेव्हापासून हे प्रकरण थंडबस्त्यात होते.
गुरुवारी अचानक हे तिघे यवतमाळातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर कुणालाही काही कळायच्या आत स्वत:जवळ आणलेल्या डब्यातील विष प्राशन केले. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिघांनाही तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यात दारव्हा दिवाणी न्यायालयाशी संबंधित एक निवेदन आढळून आले. त्यावरूनच या शेतकऱ्यांची ओळख पटली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांनी शासकीय रुग्णालयात पोहोचून त्यांची भेट घेतली.
मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही. नेमके प्रकरण काय याचा महसूल व पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
सलग दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न
न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर पोलीस व ज्याच्या बाजूने निकाल लागला, ते ताबा घेण्यासाठी आले असता या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची सहा महिन्यांपूर्वी दारव्हा पोलिसांनी नोंद घेतली होती. यानंतर शेतीचा ताबा घेताना आडकाठी येत असल्याने गुरूवारी दारव्हा ठाणेदारांनी दोनही गटांसह डोल्हारी देवी येथील पोलीस पाटील व तंटामुक्त समितीला ठाण्यात बोलाविले होते. मात्र गौतम कुटुंबीयांनी तेथे न जाता थेट यवतमाळ गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा हा सहा महिन्यातील दुसरा प्रयत्न आहे.
जिल्हाधिकारी कक्षासमोरील दुसरी घटना
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कक्षासमोर विष घेतल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दारव्हा तालुक्यातीलच शेंद्री येथील एका युवा शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुवारी विष घेणारेही प्रामाणिकपणे शेतीत राबत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र कौटुंबिक वादातून शेतीच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.