जिल्ह्यात खतासाठी तीन रॅक पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:24+5:30
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार करावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका व परिसराकरिता लगतच्या नांदेड जिल्ह्यात रॅक पॉईंट द्यावा,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर होतो. मात्र १६ तालुक्याच्या जिल्ह्यासाठी धामणगाव(रेल्वे) येथे एकमेव रॅक पॉईंट आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. ही अडचण ओळखून पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत जिल्ह्याला चंद्रपूर व नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर रॅक पॉईंट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला मान्यता मिळाली आहे.
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार प्रचंड आहे व येथील संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. धामणगाव(रेल्वे) रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा जिल्ह्यातील उमरखेड, वणी, पुसद या तालुक्यांमध्ये करताना अनेक अडचणी येतात. सुमारे १५० किलोमीटरच्यावर अंतर पार करावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका व परिसराकरिता लगतच्या नांदेड जिल्ह्यात रॅक पॉईंट द्यावा, तर वणी परिसरासाठी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात रॅक पॉईंट तयार करावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे प्रत्येक तालुक्यात वेळेत खत पोहोचविणे शक्य होणार आहे. शिवाय एकट्या रॅक पॉईंटवरून पुरवठा होत असल्याने बरेचदा ऐन हंगामात खताची टंचाई निर्माण होते. पिकांना वेळेवर खत न मिळाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. ही अनेक वर्षांपासूनची समस्या पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीत मांडून दोन नवीन रॅक पॉईंट उपलब्ध करून दिले आहे.
जिल्ह्याला २०२०-२१ या खरीप हंगामासाठी एक लाख ६६ हजार ४६९ मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीद्वारे सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सीईओ जलज शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळा पाटील कामारकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.