कूलरचा शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:21 PM2020-07-30T12:21:23+5:302020-07-30T12:50:46+5:30
राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली (श्रीरामपूर) येथे गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कूलरचा शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील कोदुर्ली (श्रीरामपूर) येथे कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
रिया गजानन भुसेवार (८ वर्षे), मृणाली गजानन भुसेवार (६) आणि संचिता गजानन भुसेवार (४) अशी मृत बहिणींची नावे आहेत. या चिमुकल्यांचे वडील शेतात फवारणीसाठी, तर आई निंदणासाठी गेली होती. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रिया ही कुलरमध्ये पाणी भरत होती. त्यावेळी अचानक तिला शॉक लागला. त्यामुळे मृणाली व संचिता या चिमुकल्या तिच्याकडे धावल्या. त्यांनाही जबर शॉक लागला. यात तिघींचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती राळेगाव तहसीलदार व पोलिसांना देण्यात आली. तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूमुळे कोदुर्ली (श्रीरामपूर) गावावर शोककळा पसरली आहे.