उपाध्यक्षांकडील चोरीत तीन संशयित टप्प्यात
By Admin | Published: March 21, 2016 02:18 AM2016-03-21T02:18:30+5:302016-03-21T02:18:30+5:30
जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे
यवतमाळ : जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले असून तीन चोरटे पोलिसांच्या टप्प्यात आले आहे. दोघांची संशयावरून चौकशी सुरू असून चोरटे लोहारा येथील असल्याचे पुढे आले आहे.
येथील दर्डानगरातील बाळासाहेब मांगुळकर यांच्या घरी १३ मार्च रोजी धाडसी चोरी झाली होती. त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील काढून चोरट्याने घरात प्रवेश केला होता. मांगुळकर परिवार झोपलेल्या खोलीतूनच चोरट्याने अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. विशेष म्हणजे चोरटा मांगुळकरांच्या तावडीतून त्या दिवशी थोडक्यात बचावला. या घटनेने पोलीस खडबडून जागे झाले होते. तपासासाठी जिवाचे रान सुरू झाले. त्यातच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे देण्यात आला. या पथकाने गत आठ दिवसांपासून विविध मार्गाने या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू केला. खबऱ्यांनाही कामे लावण्यात आले होते.
दरम्यान रविवारी सकाळी या चोरी प्रकरणात प्राथमिक यश आले. चोरटे यवतमाळ लगतच्या लोहारा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू व त्यांच्या पथकाने संशयित आरोपींची इत्यंभूत माहिती गोळा केली. या आरोपींवर शहर व वडगाव रोड ठाण्यात चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला. या संशयावरूनच लोहारा येथील रेल्वे फाटक परिसरात राहणारा गौरव वाकोडे (२१) आणि टकल्या उर्फ सतीश उईके (२०) या दोघांची कसून चौकशी पोलीस करीत आहे. घटनेतील तिसरा संशयित फरार असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. अद्यापपर्यंत पोलीस अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचले नाही. चोरीचा मुद्देमाल आणि आणखी ठोस पुरावे मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील संजय दुबे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघण, ऋषी ठाकूर आदी कर्मचारी सहभागी आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
खबऱ्याकडून लागला सुगावा
४जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रचंड दबाव होता. शिवाय सातत्याने होत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांवर चौफेर टीका सुरू होती. या स्थितीतच गुन्हे शाखेने आपल्या खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या टीपवर तपास केंद्रीत केला. दारव्हा मार्गावरील तिरुपती नगर परिसरात एका दारू गुत्यावर दोघांमध्ये सुरू असलेल्या वार्तालापातून या धाडसी घरफोडीचा सुगावा लागला. अधिक चौकशी केली असता आरोपीही टप्प्यात आले आहे. लवकरच हा गुन्हा उघडकीस येणार आहे.