तिघांची २४ लाखाने फसवणूक
By admin | Published: August 3, 2016 01:39 AM2016-08-03T01:39:10+5:302016-08-03T01:39:10+5:30
भूखंड विक्रीत तीन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी केमीस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र येरणे याला
गुन्हा दाखल : केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक
वणी : भूखंड विक्रीत तीन ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी केमीस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र येरणे याला पोलिसांनी सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केली.
शहरातील विराणी टॉकीज परिसरातील हफिज रहेमान खलील रहमान (४८) यांना रवींद्र दामोधर येरणे (४२) याने गेल्या जानेवारी २०१५ मध्ये केळापूर तालुक्यातील कोठोडा येथील भूखंड विकणार असल्याबाबत सांगितले. या जमिनीचे क्षेत्रफळ एक हेक्टर ३२ आर होते. येरणे यांनी रहमानकडे हा भूखंड पाहिजे असल्यास ‘मी इसारापत्र करून द्यायला तयार आहे’, असे सांगितले. यावर रहेमान यांनी होकार दर्शविला. या भूखंडाची किंमत २६ लाख रूपये सांगितल्याने रहेमान यांनी हा भूखंड तिघांमध्ये घेण्याचे ठरविले.
त्यानंतर रहेमान यांनी मिनाज ग्यासीद्दीन शेख, इकबाल खान समशेर खान व मोहम्मद युसुफ अब्दुल रफिक सर्व रा.वणी या तिघांनाही भूखंड विक्रीची माहिती दिली. त्यावर या तिघांनीही होकार देत भूखंड घेण्याचे ठरविले. त्यानुसार गेल्या २८ जुलै २०१५ रोजी या तिघांनीही रवी येरणे यांना २४ लाख रूपये देऊन १०० रूपयांच्या मुद्रांकावर इसारपत्र करून घेतले. ठरल्याप्रमाणे उर्वरित दोन लाख रूपयांचा धनादेश विक्रीच्या दिवशी देण्याबाबत निर्णय घेतला होता.
२६ मे रोजी या भूखंडाची विक्री करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार हे तिघेही केळापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचले. मात्र रवी येरणे हे कार्यालयात सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित झाले नाही. त्यानंतर येरणे याच्याशी संपर्क साधला असता, ‘मी विक्रीकरिता आवश्यक असलेले कागदपत्र आणले नाही, त्यामुळे येऊ शकत नाही’ असे सांगितले.
त्याच्या बोलण्यावर या तिघांनाही संशय आल्याने या भूखंडाबाबत चौकशी केली असता, सदर भूखंडावर यवतमाळ महिला सहकारी बँकेचा एक कोटी ५० लाखांचा बोजा असल्याचे आढळून आले. तसेच ही जमीन अकृषक करताना ती खारीज केल्याची माहिती त्यांना मिळाली.
याबाबत तिघांनीही अनेकदा येरणे याच्याकडे विक्रीबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा या तिघांचीही २४ लाखाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हाफिज रहेमान यांनी सोमवारी वणीच्या पोलीस ठाण्यात त्यांनी रितसर तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून रवींद्र येरणेविरूद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. बुधवारी येरणे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)