यवतमाळच्या व्यापाऱ्याला १० लाखांनी फसवणाऱ्या तीन ठगांना बिहारमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 11:59 AM2022-03-24T11:59:24+5:302022-03-24T12:11:16+5:30
त्या ठगांनी व्यापाऱ्याच्या बॅँक खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले व ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून ट्रान्सफर करीत काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याला व्यापारात अधिक नफा कमविण्यासाठी इंटरनॅशनल ट्रेडिंगचे खाते कसे फायदेशीर आहे, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर यामध्ये ५० हजार गुंतवणूक हे खाते उघडावे असे सांगण्यात आले. लिंक डाऊनलोड करताच व्यापाऱ्याच्या खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले. हा गुन्हा यवतमाळ अवधूतवाडी पोलिसांनी उघड करीत बिहार आझमनगर येथून तिघांना अटक केली.
असद जफर बॉम्बेवाला यांना इंटरनॅशनल ट्रेड मार्केटिंगमध्ये मोठा नफा कमाविता येतो, असे सांगण्यात आले. हे खाते उघडण्यासाठी ५० हजारांची गुंतवणूक असून, त्याची लिंक युनायटेड किंगडम ऑन व्हॉट्सॲप व्यापाऱ्याला सेंड करण्यात आली. त्यांनी ही लिंक डाऊनलोड करताच काही तासांत त्या ठगांनी व्यापाऱ्याच्या बॅँक खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले व ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून ट्रान्सफर करीत काढली. जेणेकरून पोलीस तपासांत आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी खेळी या ठगांनी केली. फसवणूक झाल्यावर असद बॉम्बेवाला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांनी सुरू केला. आरोपी बिहारमधील आझमनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अवधूतवाडी पोलिसांनी आझमनगर येथे जाऊन मो. जमील मो. अख्तर (रा. रंगापोखर), उपदेश शर्मा (रा. बुधौलमनी), यासीर अरफत (रा. निस्ताशेखपूर) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना गुन्ह्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.
थेट बिहारसारख्या राज्यात जाऊन गावखेड्यात दडलेल्या आरोपीचा माग काढण्यात तपास अधिकारी धीरेंद्रसिंह बिलवाल यांना यश आले. आता या आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. त्यांच्याकडून देशपातळीवरील फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.