अवैध रेती वाहतुकीने घेतला तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:59 PM2019-02-25T21:59:54+5:302019-02-25T22:00:06+5:30
जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : जिल्ह्यात सर्रास अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. रात्री आर्णी व घाटंजी तालुक्यातून चोरटी वाहतूक केली जाते. याच वाहतुकीने रविवारी रात्री ११.३० वाजता तिघांचा बळी घेतला. घाटंजी तालुक्यातील कोळी-लिंगी येथे रेतीच्या ट्रकला अपघात झाला.
अडाण नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रक यवतमाळकडे येत असताना अपघात घडला. भरधाव ट्रक कोळी-लिंगी गावाजवळच्या वळणावर अचानक पलटी झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश मेश्राम, किसन ठाकरे हे रेतीच्या ढिगाऱ्यात दबले. तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामध्ये विक्रम सक्रापुरे, प्रभाकर देवीदास ससाने, मंगेश शंकर ससाने, दिलीप अनंत गाडेकर, सचिन श्रावण वाघमारे यांचा समावेश आहे. यातील आकाश दाभेरे व विक्रम सक्रापुरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. यातील आकाश दाभेरे याचा नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतक व जखमी हे यवतमाळनजीकच्या गोधनी येथील असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव महसूल प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे रेतीमाफियांकडून रात्रीच वाहतूक केली जात आहे. सदोबासावळी येथून, घाटंजी येथून रेती ट्रक, मॅटेडोअर व इतर काही प्रवासी वाहनातूनही यवतमाळात आणली जात आहे. याला महसूल यंत्रणेतून पाठबळ मिळत असल्याची चर्चा आहे. भीतीमुळे ट्रक भरधाव चालविले जातात. घाटात चालकाचे नियंत्रण नसल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
चौपट दराने रेतीची खुलेआम विक्री
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. एकाही रेती घाटाचा लिलाव नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात रेती येते कोठून याची चौकशी स्थानिक महसूल यंत्रणेने केली नाही. याचाच फायदा रेतीमाफिया घेत आहेत. आठ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे रेतीची विक्री सुरू आहे. संपूर्ण कामकाज मध्यरात्रीनंतरच होत आहे. या चोरट्या वाहतुकीला शहरात अभय कुणाचे असा प्रश्न उपस्थित होतो.