बालिकेवरील अत्याचारात तीन वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: February 28, 2015 01:58 AM2015-02-28T01:58:39+5:302015-02-28T01:58:39+5:30
एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा दोष सिध्द झाल्याने आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ८०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
यवतमाळ : एका १३ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा दोष सिध्द झाल्याने आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास आणि ८०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. चाफले यांनी शुक्रवारी दिला.
रमेश तिमाजी ठाकरे (४५) रा. पहूर पुर्नवसन असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पहूर पुर्नवसन येथीलच एका १३ वर्षीय बालिकेला घरी एकटी पाहून १२ मार्च २०१३ ला त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. बाभूळगाव पोलिसांनी त्याला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. हा खटला येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. सी. चाफले यांच्या न्यायालयापुढे चालला. सात साक्षी तपासून दोष सिध्द झाला. त्यावरून आरोपी रमेश याला बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम ८ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास आणि ८०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाय विनयभंग, बळजबरीने घरात प्रवेश आदी गुन्ह्यातही शिक्षा ठोठावली.
मात्र या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत असे आदेशात म्हटले आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी वकील निलीमा जयवंत यांनी युक्तीवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)