चिंताजनक; यवतमाळ जिल्ह्यात तीन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 09:04 PM2021-09-02T21:04:43+5:302021-09-02T21:05:11+5:30
यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, नेर आणि उमरखेड तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले.
यवतमाळ : जिल्ह्यात राळेगाव, नेर आणि उमरखेड तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. (Three young farmers commit suicide in Yavatmal district)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील विशाल भाऊराव खोंडे (३६) यांनी पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल एकुलता मुलगा होता. घरातील तो कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व आप्त परिवार आहे. वडकी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. विशाल परिसरात डाॅक्टर म्हणून परिचित होता.
दुसऱ्या घटनेत नेर शहरातील अशोकनगर पारधी वसाहतीत यादेश राजधानी राठोड (२१) याने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
तिसऱ्या घटनेत उमरखेड तालुक्यातील टाकळी गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ईसापूर (पिंपळवाडी) येथील प्रकाश सीताराम चव्हाण(४२) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.