वर्धा नदीत तीन युवक बुडाले; युद्धपातळीवर शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:17 PM2024-03-08T21:17:58+5:302024-03-08T21:18:16+5:30
महाशिवरात्रीच्या यात्रेवरून परत येताना घडली दुर्घटना.
संतोष कुंडकर, वणी (यवतमाळ) : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रा करून परत येत असलेले तीन युवक वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीत बुडाले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे तिघेही वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
संकेत पुंडलिक नगराळे (२७), अनिरूद्ध चाफले (२२) व हर्ष चाफले (१६) अशी नदीपात्रात बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच, वणी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. माजरी (जि.चंद्रपूर) येथील पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पाण्यात बुडालेल्या तरूणांचा शोध सुरू होता. मात्र वृत्त लिहिस्तोवर बुडालेल्या तरूणांचा शोध लागला नव्हता.
संकेत नगराळे, अनिरूद्ध चाफले व हर्ष चाफले हे तिघेजण काही मित्रांसमवेत शुक्रवारी सकाळी भटाळी येथील महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी परत येताना वणीपासून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या पाटाळा येथील वर्धा नदीवर आंघोळीसाठी थांबले. नदीपात्रात उतरल्यानंतर एका पाठोपाठ तिघेही नदीच्या खोल डोहात बुडाले. सोबतच्या मित्रांनी या घटनेबाबत घरच्यांना व नंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बुडालेल्या तरूणांचे नातलग व मित्र घटनास्थळी पोहचले.
माहिती मिळताच, वणीचे ठाणेदार अनिल बेहरानी, तहसीलदार निखील धुळधर हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुडालेल्या तीन तरूणांचा माजरी पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र तरूणांचा शोध लागला नाही. शोध घेण्यासाठी यवतमाळ येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार निखील धुळधर यांनी दिली.