जिल्ह्यात दिवसभर संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:01 PM2018-07-09T22:01:24+5:302018-07-09T22:01:50+5:30
जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर सर्वदूर संततधार पाऊस बरसत होता. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. तर काही ठिकाणी पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावात शिरले. तर काही मार्ग ठप्प झाले होते. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात दोघांचा मृत्यू झाला.
गत महिनाभरापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांना सोमवारी पावसाने क्षणभरही उसंत न घेता अक्षरश: चिंब केले. रात्रीपासूनच पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. अनेक गावांंना या पुराचा फटकाही बसला. पुसद तालुक्यातील बान्सी येथे नाल्याच्या पुरात गुड्डू अनिल आगलावे (१८) आणि विनोद लक्ष्मण शिलार (३५) वाहून गेले. त्यांचे सोमवारी सकाळी प्रेतच आढळून आले. वणी तालुक्यातील पेटूर नाल्यात वाहून गेलेल्या सुनील सुभाष भोयर या तरुणाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही.
उमरखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. रविवारी सुमारे तीन तास दहागाव व पळशी फाट्यावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पोफाळी येथे वृक्ष कोसळल्याने पुसद-उमरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. मुकुटबन ते पाटणबोरी या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद होती. पिंप्रडवाडी, बहीलमपूर, राजूर, हिरापूर या गावांशी असलेला संपर्क पुरामुळे तुटला होता. अनेक घरांची पडझड झाली. यवतमाळ शहरातही दिवसभर पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरण्याच जलपातळीत काही अंश वाढ झाली.
२४ तासात २१.१२ मिमी पाऊस
रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात २१.१२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस मारेगाव तालुक्यात ५६.८० टक्के नोंदविला गेला. त्या खालोखाल वणी ४१.५०, उमरखेड ४०.५७ टक्के पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस दारव्हा, बाभूळगाव या तालुक्यात नोंदविला गेला.