आपला जीन प्रेसच्या आमसभेत गदारोळ
By admin | Published: September 20, 2015 12:10 AM2015-09-20T00:10:24+5:302015-09-20T00:10:24+5:30
स्वमालकीच्या नसलेल्या जागेवर दुकान गाळे बांधण्याच्या प्रकारावर आक्षेप घेत येथील आपला जीन प्रेसच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.
विरोधकांचा गदारोळ : दुकान गाळ्यांच्या बांधकामावर आक्षेप
उमरखेड : स्वमालकीच्या नसलेल्या जागेवर दुकान गाळे बांधण्याच्या प्रकारावर आक्षेप घेत येथील आपला जीन प्रेसच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे या संस्थेची शनिवारची आमसभा अवघ्या काही मिनिटात गुंडाळली गेली. येथील संजोग भवनात ही सभा बोलाविण्यात आली होती.
संस्थेचे अध्यक्ष बालाजी उदावंत हे आमसभेचे अध्यक्ष होते. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बळवंतराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमीरे, प्रदीपराव देवसरकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे, रमेश चव्हाण, पंचायत समिती उपसभापती विठ्ठलराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, उपसभापती भैयासाहेब नाईक, जीन प्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलराव राणे, काशीनाथ पेंधे, शरद पुरी, सूर्यवंशी, डॉ. अजय नरवाडे, रविकांत रूडे, रामराव नरवाडे, डी.डी. जाधव, धनुराव धोपटे, बाबूराव कदम यांची मंचावर उपस्थिती होती.
आमसभेच्या सुरुवातीला जीन प्रेसचे व्यवस्थापक जोशी यांनी वार्षिक आर्थिक अहवाल वाचन केले. यानंतर संस्थेचे सभासद विकास चव्हाण आणि भीमराव चंद्रवंशी यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. संस्थेतर्फे बांधण्यात येत असलेले ३८ गाळे याविषयीचा मुद्दा चांगलाच गाजला. बांधकाम होत असलेली जागा आपला जीन प्रेसच्या मालकीची नाही. ही बाब आमसभेत सातबारा दाखवून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, १९ सप्टेंबरचा हा सातबारा होता. १६ सप्टेंबर २०१४ रोजी बनावट सातबारा देऊन फेरफार करून घेतल्याचा आरोपही यावेळी चव्हाण व चंद्रवंशी यांनी केला. आजच्या स्थितीतील सातबारा हा सक्षम पुरावा असल्याने बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी रेटण्यात आली. येथूनच सभेत एकच गदारोळ निर्माण झाला.
दुकान गाळे थांबविण्याचा ठराव विलास चव्हाण यांनी मांडला. त्याला भीमराव चंद्रवंशी यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांनीही आवाजी मताने ठरावाला सहमती दर्शविली. एकूणच या सभेत संस्थेच्या हिताच्यादृष्टीने कुठलीही चर्चा झाली नाही. संपूर्ण सभेत गदारोळ झाला. अवघ्या काही वेळेत सभा गुंडाळली. (शहर प्रतिनिधी)