टिपेश्वर अभयारण्यात वाघ मृतावस्थेत आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:20 AM2023-06-30T11:20:51+5:302023-06-30T11:21:37+5:30
घाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप कायम
पांढरकवडा (यवतमाळ) : टिपेश्वर अभयारण्यांतर्गत पाटणबोरी वन्यजीव परिक्षेत्रांतर्गत अर्ली वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गुरुवारी सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे वनवर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. वाघाचामृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप कायम आहे.
गुरुवारी सकाळी वनरक्षक राजू तुमराम हे हंगामी मजुरांसह अर्ली वन वर्तुळातील, भवानखोरी बिट कक्ष क्र. १०५ मध्ये गस्त करीत असताना त्यांना एका वाघाचे शव निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. या वाघाचा अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मृत वाघाचे निरीक्षण केले. निरीक्षणामध्ये मृत वाघ हा नर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. तसेच वनअधिकारी यांनी आजूबाजूच्या परिसरात फिरती केली असता कुठेही मानवी पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत वाघाचे सर्वासमक्ष शवविच्छेदन केले. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
शवविच्छेदनाचे आवश्यक ते सीलबंद नमुने तपासणीसाठी उपसंचालक, प्रादेशिक न्याय सहायक, वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात येणार आहेत. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, हे तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कळू शकणार आहे. या घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) रवींद्र कोंडावार करीत आहेत.